लोकमत इम्पॅक्ट: जिजाबाईंच्या सुराला मिळाली साथ; हरसुलची आजी होणार आता सिनेमाची गायिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 04:49 PM2019-08-23T16:49:30+5:302019-08-23T16:56:29+5:30
होय, मागच्या आठवड्यात तुम्ही ज्या गोड गळ्याच्या आजीची बातमी वाचली, तिच्याच यशाची ही पुढची गोष्ट आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : गावच्या मातीत अख्खे आयुष्य मुक्त गाणारी एक निरक्षर मुलगी आज सत्तर वर्षांची आजी झाली. तिच्या गाण्यात कोकीळेचा गोडवा असला तरी आजवर तिला मंच मिळाला नाही. ‘लोकमत’ने तिची उपेक्षित सूरमयी जिंदगी समाजापुढे आणल्यावर सिनेदिग्दर्शक सरसावले आहेत. हरसुल नावाच्या छोट्याशा खेड्यातच मिसळून मर्यादित राहिलेले तिचे सूर आता लवकरच सिनेगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राला तृप्त करणार आहेत.
होय, मागच्या आठवड्यात तुम्ही ज्या गोड गळ्याच्या आजीची बातमी वाचली, तिच्याच यशाची ही पुढची गोष्ट आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हरसूल (ता. दिग्रस) या छोट्याशा खेड्यात जिजाबाई भगत या अस्सल गावरान मावशीची गोष्ट आहे. रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या जिजाबाईच्या कंठात जन्मजात गाणे आहे. तिचे गाणे ऐकताना गावकऱ्यांना वाटते जणू लता मंगेशकरांचेच गाणे ऐकतोय! पण या गानकोकीळेच्या नशिबी सत्तर वर्षांचे आयुष्य लोटूनही कधीच प्रसिद्धीचे चार क्षण आले नाही. शेवटी ‘लोकमत’ने १८ ऑगस्ट रोजी ‘सत्तरीच्या संघर्षात मुरलेला सदाबहार स्वर’ या मथळ्याखाली ही उपेक्षित प्रतिभा जगासमोर आणली. अन् जगाचे डोळे विस्फारले.
बातमी वाचा - वावरात मजुरी, घरात गरिबी, अंगात आजार तरी 'तिच्या' गळ्यात गोडवा
‘लोकमत’ची बातमी वाचून मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रशांत मानकर यांनी आपल्या आगामी चित्रपटात जिजाबाईकडून एक गाणे गाऊन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी लवकरच ते हरसूल गावातही भेट देणार आहेत. तर दुसरीकडे जिजाबाईंच्या उतारवयात मदत करण्यासाठी अनेकांनी हात पुढे केला आहे. पुसद, बुलडाणा, अकोलासारख्या गावातून विविध मंडळांनी जिजाबाईच्या गाण्याचे कार्यक्रम करण्याचे निमंत्रण देऊ केले आहे.
बालपणापासून सुरांची साधना करता-करता अन् घरातल्या गरिबीशी लढता-लढता जिजाबाईने लग्नच केले नाही. आज वृद्धत्वाचे दिवस भोगतानाही ती एकटीच असते. एका हात पूर्णत: निकामी झालेला आहे, तरीही जिजाबाई शेतमजुरी करते. धुणीभांडी करून गुजराण करते. अखेर ‘लोकमत’मधून जिजाबाईचे गाणे कळल्यावर दिग्रसच्या प्रशासनाने त्यांना वृद्ध कलावंत योजनेतून नियमित मानधन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातही जिजाबाईला मान मिळू लागला आहे. लवकरच त्यांचे गाणे सिनेमात येणार आहे.
शेवटी शेवटी रंग भरला जरा, जीवनाशी आता सूर जुळला खरा, सुरेश भटांच्या या गझलेसारखेच जिजाबाईंचे उपेक्षित आयुष्य शेवटच्या काळात सुखाकडे झेपावले आहे.
माझा ‘जिव्हार’ नावाचा सिनेमा लवकरच येऊ घातला आहे. त्यातल्या ९ पैकी एक गाणे मी जिजाबाईंकडून गाऊन घेणार आहे. उर्वरित गाणी साधना सरगम, शान, उदीत नारायण यांच्या स्वरात येणार आहेत. जिव्हार म्हणजे अंतर्मनातून येणारी हाक. जिजाबाईंसारख्या कलावंतांना गॉडफादर मिळत नाही. त्यांची प्रतिभा गावातच मर्यादित राहते. पण जिजाबाईंच्या बाबतीत असे होणार नाही. - प्रशांत मानकर, सिने दिग्दर्शक, मुंबई
तुमची सर्वायची साथ असन तं मी सिनेमात गाणं म्हणाले तयार हावो बाप्पा. मले पयलंपासूनच शौक हाये गाण्याचा. पण मी हाये अडाणी. मायासारखीले सिनेमात गाणं म्हणाले भेटनं हे तं लई मोठी गोष्ट हाये. - जिजाबाई भगत, वृद्ध गायिका, हरसूल