आसाराम बापूची सर्वप्रथम ‘लोकमत’ने केली होती पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 08:08 PM2018-04-26T20:08:06+5:302018-04-26T20:08:17+5:30

बलात्काराच्या गुन्ह्यात जोधपूर न्यायालयाने आजन्म तरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या आसाराम बापूची ‘लोकमत’ने १५ वर्षांपूर्वीच पोलखोल केली होती.

Lokmat initiates first to expose Asaram Bapu in 2003 | आसाराम बापूची सर्वप्रथम ‘लोकमत’ने केली होती पोलखोल

आसाराम बापूची सर्वप्रथम ‘लोकमत’ने केली होती पोलखोल

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सारा धर्माचाच बाजार’ १५ वर्षांपूर्वीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बलात्काराच्या गुन्ह्यात जोधपूर न्यायालयाने आजन्म तरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या आसाराम बापूची ‘लोकमत’ने १५ वर्षांपूर्वीच पोलखोल केली होती. डिसेंबर २००३ मध्ये यवतमाळात सत्संगासाठी आले असता ‘लोकमत’ने ‘सारा धर्माचाच बाजार’ यातून बापूंच्या कृत्यांचा पर्दाफाश केला होता. आता जोधपूर न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने त्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले.
देशातील क्रमांक एकचे म्हणविणारे आसाराम बापू डिसेंबर २००३ मध्ये सत्संगासाठी यवतमाळात आले होते. त्यावेळी बापूंचा लाखोंचा भक्तसमुदाय यवतमाळात एकत्र आला होता. आसाराम बापूंचे खास विमानाने आगमन झाले होते. दोन दिवस त्यांनी भक्तांना उपदेशाचे डोज पाजले होते. आसारामच्या विरोधात कुणाची ब्र काढायचीही हिम्मत नव्हती. त्यावेळी लोकमतने १८ डिसेंबर २००३ च्या अंकात जिल्हा वार्तापत्राच्या माध्यमातून बापूंची पोलखोल केली होती. लाखोंची गर्दी खेचणाऱ्या बापूंची दुकानदारी या वार्तापत्रातून पुढे आणली होती. बापूंना हार घालण्यासाठी त्यावेळी १५ हजार रुपये मोजावे लागत होते. मंत्रदीक्षेसाठी पावती फाडावी लागत होती. सत्संगात पैशाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नव्हती. प्रचारसाहित्यासह विविध वस्तूंची येथे विक्री करण्यात आली होती. बापूंच्या या व्यवहाराचा पर्दाफाश करण्यात आला. तसेच आसारामचे मानधन आणि त्याच्या सुरक्षा कवचावरही टीका करण्यात आली होती.
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आसारामच्या भक्तात भूकंप झाला. लोकमतला धमक्या देणारे फोन आणि पत्र येऊ लागले. यवतमाळ कार्यालयासह नागपूर कार्यालयातही बापूंचे भक्त धडकत होते. परंतु लोकमतने त्यावेळी कुणापुढेही भीक घातली नाही. लोकमत आपल्या भूमिकेवर ठाम होता. पुरोगामी विचाराच्या भूमिकेवर ठाम राहत आसारामांच्या भक्तांना आल्या पावली परत पाठविले. माफीच काय साधा खुलासाही त्यावेळी लोकमतने प्रसिद्ध केला नाही. आता या तथाकथित धर्मगुरूला जोधपूर न्यायालयाने आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्याच्या कृष्णकृत्यांवर मुद्रित आणि ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधून भरपूर लिहिले व दाखविले जात आहे. मात्र ज्यावेळी आसारामविरोधात कुणाची बोलायची हिम्मत नव्हती त्यावेळी लोकमतने आसारामच्या कृत्याचा पर्दाफाश केला. आज ते सत्य जगाला पटले.

Web Title: Lokmat initiates first to expose Asaram Bapu in 2003

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.