लोकमत विशेष; यवतमाळातील दोन काँग्रेस नेत्यांना ‘सीएम’ पदाचे डोहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:46 AM2018-11-20T11:46:22+5:302018-11-20T11:50:02+5:30
जिल्ह्यातील दोन काँग्रेस नेत्यांना थेट मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत. त्यासाठी त्यातील एका तरुण नेत्याने लोकसभा न लढविण्याचे ठरविले आहे. तर दुसऱ्याने आधी लोकसभा जिंकायची व नंतर दिल्लीतून राज्यात परत यायचे, अशी व्यूहरचना केल्याची माहिती आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दोन काँग्रेस नेत्यांना थेट मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत. त्यासाठी त्यातील एका तरुण नेत्याने लोकसभा न लढविण्याचे ठरविले आहे. तर दुसऱ्याने आधी लोकसभा जिंकायची व नंतर दिल्लीतून राज्यात परत यायचे, अशी व्यूहरचना केल्याची माहिती आहे.
खासदार राजीव सातव आणि माणिकराव ठाकरे अशी या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडू लागलेल्या नेत्यांची नावे आहेत. राजीव सातव हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करतात. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत ते १^६०० मतांनी निवडून आले. जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाने त्यांना तारल्याचे सांगितले जाते. परंतु आता ते लोकसभा लढविणार नाही, असे सांगितले जाते. वास्तविक आता मोदींच्या विरोधात वातावरण असल्याने सातव यांना लोकसभा सोपी गेली असती. मात्र कदाचित पराभवाच्या भीतीतून त्यांनी लोकसभेतून माघार घेतली नाही ना, असा सूर ऐकायला मिळतो आहे.
प्रदेशाध्यक्षांना शेजारी जिल्ह्यातूनच ब्रेक
राजीव सातव यांचे स्वप्न खरे ठरल्यास राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची मनिषा बाळगणाऱ्या प्रदेशाध्यक्षांना शेजारील जिल्ह्यातूनच ब्रेक लावला जाऊ शकतो. काँग्रेसचा प्रत्येक नेता पक्षाऐवजी स्वत:च्या सुरक्षित प्लॅटफॉर्मचा विचार करीत असल्याने काँग्रेसच्या युवराजाला पंतप्रधान बनविणार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. मोठ्या पदाची महत्वाकांक्षा जागृत झालेले हे नेते पक्षाचा विचार करीत नसल्याचे दिसते.
दिल्लीतून मुंबईत येण्याची व्युहरचना
माणिकराव ठाकरेंचेही असेच आहे. राज्यातील ‘टॉप फाईव्ह’ काँग्रेस नेत्यांमध्ये आपण असल्याचे ते मानतात. वेळ पडल्यास व विदर्भाला झुकते माप द्यायचे झाल्यास मुख्यमंत्री पदी आपली वर्णी लागू शकते असा विचार ठाकरे करीत असल्याचे पक्षातूनच सांगितले जाते. मात्र विधानसभेच्या दृष्टीने त्यांना सुरक्षित मतदारसंघ सध्या तरी नाही. दिग्रस-दारव्हा या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘पंजा’ चालण्याची चिन्हे नाहीत. यवतमाळ मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा मुलगा राहूल चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याने येथेही शक्यता नाही. म्हणून आधी यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक लढवायची, सलग चार टर्म प्रतिनिधीत्व करणाºया भावना गवळींच्या विरोधातील वातावरणाचा, शिवसेनेतील गटबाजीचा फायदा घेऊन निवडून यायचे व आपणही लोकांमधून निवडून येऊ शकतो हे पक्षाला सिद्ध करून दाखवायचे आणि नंतर राज्यातील गरज ओळखून वेळप्रसंगी पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर डोळा ठेऊन परत यायचे, अशी ठाकरेंची खासगीतील व्युहरचना आहे.
स्वप्नपूर्ती होणार की स्वप्नांचा चुराडा?
यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित दोन नेत्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहे. दिल्लीतील ब्रिगेडमध्ये वावरणाऱ्या राज्यात अशा अनेक तरुण काँग्रेस नेत्यांना ही स्वप्ने पडत असल्याचे सांगितले जाते. यशोमती ठाकूर या महिलांमधून दावा करणार आहे. तर राजीव सातव हे राज्यात बहुसंख्य असलेल्या माळी समाजाला कधीच प्रतिनिधीत्व मिळाले नाही, ती संधी आता आहे असे दाखवून पक्षाकडे मोर्चेबांधणी करू शकतात. मुख्यमंत्री पद नाहीच जमले तर राज्यात कॅबिनेट आणि त्यातही महत्वाचे खाते असे दुसरे टार्गेट या नेत्यांनी ठेवल्याचे सांगितले जाते. या नेत्यांच्या स्वप्नांची पूर्तता होते की चुराडा होतो, हे मात्र वेळच सांगेल.
अन्य राज्यांत युवा नेतृत्वाला संधी
सातव यांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागल्याचे बोलले जाते. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानात सचिन पायलट, दिल्लीत जितेंद्र सिंग, अजय माकन या दिल्ली ब्रिगेडमधील युवा नेत्यांना मुख्यमंत्री बनविले जाऊ शकते. त्याच धर्तीवर राज्यात राजीव सातव, महिलांमधून तिवसा (जि. अमरावती) येथील आमदार यशोमती ठाकूर यांना आपणही मुख्यमंत्री बनविले जाऊ शकतो, असे वाटू लागले आहे. त्याचमुळे सातव यांनी लोकसभेचा नाद सोडल्याचे सांगितले जाते.
हिंगोली मतदारसंघाकडे दुर्लक्ष, उमरखेड-महागावचे मतदार नाराज
सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व गुजरातचे निरीक्षक आहेत. पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर काम करीत असताना या नेत्यांचे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले हेही तेवढेच खरे. त्यामुळे मतदारांची त्यांच्या विरोधात नाराजी आहे. राजीव सातव आपल्या कळमनुरी या जुन्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. तेथील विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे यांना लोकसभेसाठी तयार केले जाऊ शकते.