चार लाख जनसामान्यांंना गॅस सबसिडीचे लॉलीपॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 05:00 AM2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:20+5:30
यवतमाळ जिल्ह्यात साडेसहा लाख गॅस सिलिंडर धारक आहेत. या गॅस सिलिंडरमध्ये धनिक नागरिकांना सबसिडी सोडण्याचे आवाहन काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाने केले होते. प्रत्यक्षात कोणीच सबसिडी सोडली नाही. यामुळे गाजावाजा न करता जनसामान्यांच्या गॅस सिलिंडरवरील सबसिडी नगण्य करण्यात आली. आता गॅसधारकांना केवळ १९ रुपयांची सबसिडी मिळत आहेत. ही सबसिडी म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे.
रुपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांनी कमी झाल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात ही सबसिडी उज्ज्वला गॅसच्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. प्रत्यक्षात उज्ज्वला गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांचे प्रमाण शून्य झाले होते. त्यासाठी ही खेळी आहे. मात्र, जे मध्यमवर्गीय नागरिक आहेत, त्यांना एकही पैशाची सूट मिळालेली नाही. यातून गॅस धारकांना लॉलीपॉप मिळाल्याची चर्चा आहे.
यवतमाळ जिल्ह्यात साडेसहा लाख गॅस सिलिंडर धारक आहेत. या गॅस सिलिंडरमध्ये धनिक नागरिकांना सबसिडी सोडण्याचे आवाहन काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाने केले होते. प्रत्यक्षात कोणीच सबसिडी सोडली नाही. यामुळे गाजावाजा न करता जनसामान्यांच्या गॅस सिलिंडरवरील सबसिडी नगण्य करण्यात आली. आता गॅसधारकांना केवळ १९ रुपयांची सबसिडी मिळत आहेत. ही सबसिडी म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. केंद्र शासन सबसिडीचा आकडा देशभरातील नागरिकांची संख्या जोडून जाहीर करते. त्यामुळे जनसामान्यांना डोळ्यात धूळ फेक केल्याप्रमाणे उद्रेक कमी करण्याचा प्रयत्न होतो. आता जनसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या १९ रुपयात खात्यात किती पैसे जमा झाले हा मेसेज मिळविण्यासाठी बॅंक चार्ज रुपातच ग्राहकांच्या खात्यातील रक्कम कपात होते. हातात काहीच पडत नाही. १९ रुपयांमध्ये महागाई नियंत्रणात येईल का हा प्रश्न आहे. प्रत्येक ग्राहकाला एक हजार ३६ रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावा लागत आहे. गावामध्ये तर सिलिंडरसोबत घरपोच सिलिंडर घेऊन जाण्याचा खर्च २०० रुपये आहे. यातूनच नागरिकांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडत आहे.
मूळात २०० रुपयांची सबसिडी ही फक्त उज्ज्वला गॅस सिलिंडर धारकांनाच मिळणार आहे. या ग्राहकांना एक हजार ३६ रुपयामध्ये सिलिंडर खरेदी करायचा आहे. त्यांना अनुदान स्वरूपात २०० रुपये खात्यात जमा होणार आहेत. जिल्ह्यात या ग्राहकांची संख्या अडीच लाखांच्या घरात आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यापासून उज्ज्वला गॅसधारकांनी गॅस सिलिंडरची उचल बंद केली होती, या ग्राहकांनी गॅस सिलिंडर खरेदी करावे म्हणून २०० रुपये सबसिडी दिली जात आहे. आता प्रत्यक्षात किती ग्राहक उज्ज्वला गॅस सिलिंडर खरेदी करतात याकडे कंपन्यांचे लक्ष लागले आहे.
साडेचार लाख लीटर पेट्रोल-डिझेलची उचल
- पेट्रोलचे दर लीटरमागे ९ रुपये ९ पैशाने कमी झाले आहेत. यामुळे यवतमाळात पूर्वी १२१ रुपये ८० पैसे दराने खरेदी करावे लागणारे पेट्रोल आता ग्राहकांना ११२ रुपये ७२ पैसे लीटरप्रमाणे मिळत आहे. त्याचप्रमाणे पूर्वी १०४ रुपये ४९ पैसे प्रति लीटर दराने डिझेल मिळत होते. हे डिझेल आता ९७ रुपये १९ पैसे लीटर दराने मिळत आहे. यामध्ये ७ रुपये ३० पैशाची कपात करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून कपात झाल्यानंतर या दराची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे. याचा फायदा साडेचार लाख लीटर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. यामुळे विक्री वाढण्याची शक्यता आहे.
१२५ पेट्रोलपंपधारकांना फटका
- पेट्रोल आणि डिझेलचे दर अचानक कमी झाल्याने याची खरेदी करणाऱ्या १२५ पेट्रोलपंप धारकांना पूर्वीच्या दरात खरेदी केलेले पेट्रोल आणि डिझेल सुधारित दरात विकावे लागत आहे. लीटर मागे ७ रुपये ३० पैसे ते ९ रुपये ९ पैशापर्यंत कपात झाल्याने लाखोंचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
प्रवासाच्या तिकीट दराकडे लागल्या नजरा
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत खासगी वाहनधारक व एसटी महामंडळाकडून पेट्रोल-डिझेलची दरवाढ होताच तिकिटाचे दर वाढविले जातात. आता मात्र मोठी दर कपात लीटरमागे झाली आहे. इंधनाचे दर कमी होताच तिकिटाचे दरही कमी केले जातील काय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्र शासनाने आतापर्यंत दुसऱ्यांदा व्यावसायिकांना असा मोठा झटका दिला आहे. यावेळेस सर्वात मोठे नुकसान पेट्रोलियम व्यावसायिकांचे झाले आहे. हे नुकसान आम्हाला सहन करावे लागणार आहे.
- रमेश भूत, अध्यक्ष, पेट्रोलपंप चालक संघटना, यवतमाळ.