लांब पल्ल्याच्या शिवशाही बसचे तिकीट दर ट्रॅव्हल्सपेक्षाही महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 05:00 AM2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:20+5:30
ट्रॅव्हल्सला प्रतिस्पर्धी म्हणून शिवशाही बस रस्त्यावर उतरली आहे. मात्र, या बसगाड्यांचे मेंटनन्स पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांपैकी काही मोजक्याच गाड्या धावत आहेत. शिवशाही बसेसचे स्पेअरपार्ट वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेले नाही. याशिवाय या बसचे तिकीटही ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे शिवशाहीचे प्रवासी घटले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटीच्या संपानंतर काही नवे चित्र आणि काही नवीन समीकरणे पुढे आली आहेत. केवळ व्यावसायिक म्हणून ट्रॅव्हल्सकडे पाहिले जात होते. आता हा समज पुसण्यात ट्रॅव्हल्स चालकांनी सुरुवात केली आहे. या तुलनेत शिवशाही बसचे दर वाढले आहेत. यामुळे शिवशाहीची प्रवासी संख्या कमी झाली आहे.
ट्रॅव्हल्सला प्रतिस्पर्धी म्हणून शिवशाही बस रस्त्यावर उतरली आहे. मात्र, या बसगाड्यांचे मेंटनन्स पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांपैकी काही मोजक्याच गाड्या धावत आहेत. शिवशाही बसेसचे स्पेअरपार्ट वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेले नाही. याशिवाय या बसचे तिकीटही ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे शिवशाहीचे प्रवासी घटले आहेत.
दरामध्ये मोठी तफावत
एसटीच्या दरापेक्षा ट्रॅव्हल्सचे दर अधिक असतात. मात्र, सद्य:स्थितीत ट्रॅव्हल्सचे दर शिवशाही बसपेक्षा कमी आहेत. यामध्ये मोठी तफावत आहे.
तरीही ट्रॅव्हल्सचे तिकिट मिळेना
- ट्रॅव्हल्समध्ये स्वच्छतेवर भर देण्यात आलेला आहे. येथे मनोरंजनाचे साधन आहे.
- तर शिवशाही बसने जाताना केवळ एसी पाहायला मिळते. मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे.
तिकिटदरांत एवढी तफावत का?
चांगली सेवा देण्यावर ट्रॅव्हल्स चालकांचा विशेष प्रयत्न राहिलेला आहे. केवळ तिकीट अधिक आकारणे हा उद्देश नाही. यामुळे दर स्थिर आहे.
- रवी मेने, ट्रॅव्हल्स चालक
वर्क फ्राॅम होमनंतर आता अभियंता मंडळी पुण्याकडे वळत आहेत. यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, दर आम्ही वाढवले नाहीत.
- निरंजन मानकर, ट्रॅव्हल्स मालक
शिवशाहीचे स्पेअरपार्ट मागविले
जिल्ह्याकडे उपलब्ध असलेल्या शिवशाही बसेसपैकी अनेक शिवशाही गाड्या बंद आहेत. त्यांचे स्पेअरपार्ट बिघडलेले आहेत. त्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. इतर शिवशाही बसेस लांब पल्ल्यासाठी चालविल्या जात आहेत. या ठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचे नियोजनही करण्यात आलेले आहे.
- श्रीनिवास जोशी,
विभाग नियंत्रक