ग्रामपंचायतींसाठी लगबग
By Admin | Published: January 23, 2015 12:06 AM2015-01-23T00:06:22+5:302015-01-23T00:06:22+5:30
येत्या मे आणि सप्टेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच घेतली जाणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच गाव पुढारयांची लगबग सुरू झाली आहे.
वणी : येत्या मे आणि सप्टेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक लवकरच घेतली जाणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच गाव पुढारयांची लगबग सुरू झाली आहे. परिणामी ग्रामीण भागात ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
वणी तालुक्यातील जवळपास ३८ ग्रामपंचायतींची मुदत येत्या ७ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर ७ सप्टेंबरपर्यंत आणखी ४४ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यासाठी दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची निवडणूक विभागाने तयारी केली आहे. त्यासाठी प्रथम प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. महिलांचे आरक्षणही घोषित झाले आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी आरक्षित प्रभागांची यादी तयार झाली आहे. आता या ३८ ग्रामपंचायतींसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या ३८ ग्रामपंचायतींमध्ये बेसा, बेलोरा, भालर, चिंचोली, दहेगाव (घोन्सा), कवडशी, कुंभारखणी, लालगुडा, लाठी, मानकी, मारेगाव (कोरंबी), मोहोर्ली, मुर्धोनी, नायगाव (खु.), नायगाव (बु.), नवरगाव, निलजई, निवली, पेटूर, पिंपळगाव, परसोडा, पिंपरी (कायर), पुनवट, पुरड, रासा, सावंगी, सावर्ला, शेलू (बु.), शिरपूर, सोनेगाव, सुकनेगाव, तरोडा, उकणी, उमरी, विरकुंड, वाघदरा आणि वडजापूर या ३८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये सुकनेगाव, सावर्ला, मानकी, दहेगाव, घोन्सा, सावंगी, वडजापूर, उकणी, नायगाव, रासा, लालगुडा, शिरपूर आदी मोठ्या आणि ग्रामीण पुढाऱ्यांच्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यापैकी काही गावांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत. येत्या दोन वर्षात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक येणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पुढील रणनिती म्हणून बघत आहे.
पुढील दृष्टिकोनातून ही ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक गावपुढाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. या गाव पुढाऱ्यांची त्यांच्याच गावात किती पत आहे, हे ही निवडणूक स्पष्ट कणार आहे. परिणामी गावपुढारी आत्तापासूनच निवडणुकीच्या लगबगीत दिसून येत आहे. अनेकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. प्रभागनिहाय उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी तयार केले जात आहे. गावातील मातब्बर आपल्यासोबत राहावे म्हणून गाव पुढारी त्यांची मनधरणी करीत आहे.
वणी विधानसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आता भाजपाच्या गाव पुढाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे. अनेकांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या गावातील मताधिक्य आपल्यामुळेच मिळाल्याचे त्यावेळी ठासून सांगितले होते. आता त्यांची खरी पत दिसून येणार आहे. त्यामुळे गावपुढारी आत्तापासूनच निवडणूक रणनिती आखत आहे. या निवडणुकीमुळे सर्वच पक्षीय गावपुढारी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. गावावर वर्चस्व प्राप्त करून त्यांना आपापल्या पक्षातील स्थान अधिक मजबूत करावयाचे आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
फेब्रुवारी, मार्चमध्ये होणार मतदान, ४४ ग्रामपंचायतींचे मतदान आॅगस्टमध्ये
येत्या ७ मेपर्यंत मुदत संपणाऱ्या गा्रमपंचायतीसाठी येत्या फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. अद्याप त्याबाबतचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला नाही. तथापि जिल्हाधिकारी लवकरच हा कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांची धडधड वाढली आहे. येत्या दोन महिन्यात या निवडुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवीली जात नाही. तथापि गावागावांतील राजकीय पक्षांचे गाव पुढारी आपल्या पक्षाचे समर्थक निवडून येण्यासाठी खटाटोप करतात. त्यावरच त्यांची गावातील पकडही दिसून येते.
दुसऱ्या टप्प्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी येत्या सप्टेंबरमध्ये मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतींची मुदत ७ सप्टेंबरला संपणार आहे. तत्पूर्वीच निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायतीचा दुसरा निवडणूक टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील नेरड, नांदेपेरा, राजूर कॉलरी, मजरा, भांदेवाडा, मुंगोली, कोलगाव, तेजापूर, पठारपूर आदी महत्वाच्या गावांमध्ये निवडणूक होणार आहे. या गावांमध्ये नेहमी अतिशय चुरशीची निवडणूक होते, असे आजपर्यंत दिसून आले आहे.