कोट्यवधींच्या भंगारावर नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:11 PM2018-03-01T22:11:33+5:302018-03-01T22:11:33+5:30
तोट्यात आल्याने १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आलेल्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत करोडो रुपयांचे भंगार उघड्यावर पडून आहे.
ऑनलाईन लोकमत
वणी : तोट्यात आल्याने १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आलेल्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत करोडो रुपयांचे भंगार उघड्यावर पडून आहे. या भंगाराची सुरक्षा धोक्यात आली आहे. या खाणीतून दररोज ट्रॅक्टर व तत्सम वाहनातून भंगार पळविले जात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री गस्तीवर असलेल्या वणी पोलिसांच्या पथकाने १२.३० वाजताच्या सुमारास खाण परिसरात संशयितरित्या फिरत असलेल्या एका ट्रक्टरचालकाला वाहनासह ताब्यात घेऊन वणी पोलीस ठाण्यात आणले. चौैकशीअंती या ट्रॅक्टरद्वारे ११ लाख ९६ हजार ४४५ रुपये किंमतीचे भंगार लंपास करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. चोरीला गेलेले भंगार जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी आरंभली आहे. या कारवाईत एम.एच.२९ व्ही ४०७७ क्रमांकाचे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून या कोळसा खाणीत भंगार चोरी होत असल्याची चर्चा आहे. गंभीर बाब ही की, त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यादेखत हे भंगार पळविले जात असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर चालकाला बोलते केल्यास, भंगार चोरीचे फार मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या तरी या विषयात अधिक माहिती देण्यासाठी पोलीस तयार नाहीत. भंगार चोरी होत असले तरी या विषयात तक्रार देण्यासाठी वेकोलिचे अधिकारीही कचरत असल्याची चर्चा दबक्या आवाजात पोलीस वर्तुळात सुरू आहे.
कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण तोट्यात आल्याने १ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली आहे. या खाणीतील ६५ कर्मचाºयांचे वेकोलिच्या वणी क्षेत्रात स्थानांतर करण्यात आले आहे. यातील काही कर्मचाºयांना प्रशिक्षणासाठी तर काहींना उकणी खाणीत रुजू करून घेण्यात आले.
उर्वरित कर्मचाºयांना अन्य ठिकाणी स्थानांतरणाची प्रतीक्षा आहे. कोळसा खाण बंद असल्याने या खाणीत करोडो रुपये किमंतीचे भंगार तसेच मोठमोठी यंत्रे पडून आहेत. कोळसा खाण बंद होऊन १५ दिवस लोटत नाही तोच, ही खाण भंगार चोरट्यांच्या रडारवर आली आहे. बुधवारी रात्री तीन ट्रॅक्टर व एक टिप्पर कुंभारखणी कोळसा खाणीत शिरले होते, अशी परिसरात चर्चा आहे. मात्र वाहनांच्या संख्येबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर हे त्यापैैकीच एक असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पडघन करीत आहे.
भंगार चोरीचे तार वणीत
कुंभारखणी कोळसा खाणीतून भंगार चोरी करणारे चोरटे हे वणीतीलच असल्याचे सांगितले जाते. वणी शहरालगत बंद अवस्थेत असलेल्या जीएस आॅईल मिल या कंपनी परिसरातील लाखो रुपयांचे भंगार चोरट्यांनी गेल्या वर्षभरात लांबविले. हे मिल बंद असल्याने तेथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. त्यामुळे या ठिकाणी चोरट्यांनी कटरद्वारे लोखंड कापून लंपास केले.