बघा नातवांनो, आजीची कमाल, साठीच्या वयात प्रौढ असाक्षरांसाठीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण!
By अविनाश साबापुरे | Published: May 27, 2024 01:03 PM2024-05-27T13:03:32+5:302024-05-27T13:03:50+5:30
शेतात राबत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावलेल्या दोन आजींची यशोगाथा
अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: वावरात काबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजींनी यंदा परीक्षा दिली अन् चक्क ९८ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावला ! हातात कधीही पाटीपुस्तक न धरलेल्या, कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उतारवयात शिक्षणाची संधी मिळताच संधीचे सोने करणाऱ्या या आजी एकट्याच नाहीत बरं का! त्या आहेत दोघी. एकीचे नाव आहे मीरा मोतीराम पेंदोर. तिचे वय आहे ५५ वर्षे. अन् दुसरीचे नाव आहे सुशीला पुंजाराम ढोक. तिचे वय आहे ६५ वर्षे.
प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील ‘टाॅप’ वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे. प्रौढ असाक्षरांना शिकवून १७ मार्च रोजी त्यांची १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मीरा पेंदोर आणि सुशीला ढोक या दोन आजीबाईंनी चक्क ९८ टक्के गुणांची कमाई करत इतर ज्येष्ठ महिलांपुढे आदर्श ठेवला आहे.
कोण आहेत या आजीबाई?
सुशीला ढोक या आजी बाभूळगाव तालुक्यातील घारफळ गावच्या. तेथील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरून त्यांनी परीक्षा दिली. वृद्ध पती, दोन मुले, एक मुलगी, नातू अशा गोतावळ्यात त्या रमलेल्या. घरच्या चार एकर वावरात याही वयात त्या राबतात. तर मीरा पेंदोर या आजी यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार गावच्या. परिस्थिती बेताचीच. आयुष्यभर शिकण्याची संधीच मिळाली नाही. संधी येताच अकोलाबाजारच्या केके स्प्रिंगडेल शाळेच्या केंद्रावरून त्यांनी पेपर दिला.
पटकावले पैकीच्या पैकी गुण!
१५० गुणांच्या परीक्षेत ५०-५० गुणांचे तीन पेपर होते. त्यात सुशीला ढोक यांनी १४६ गुण मिळविले. वाचन-लेखन पेपरमध्ये ५० पैकी ५० गुण मिळविले. मीरा पेंदोर यांनीही १४७ गुणांची कमाई केली.