जीवनदायिनी वर्धा नदीच्या पात्राला डबक्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:02 PM2019-05-25T22:02:16+5:302019-05-25T22:02:40+5:30
चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
म.आसिफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरून वाहणाºया जिवनदायीनी वर्धा नदीचा नैसर्गीक प्रवाह बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या नदीला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी या नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
गंभीर बाब ही की, वर्धा नदीला लागून असलेल्या कोलार पिंपरी, तेलवासा, जुनाड या वेकोलिच्या खाणीतील मातीचे मोठमोठे ढिगारे अगदी नदीकाठावर टाकण्यात आल्याने वर्धा नदीचे संपूर्ण पात्रच बुजले आहे. परिणामी नदीचा प्रवाहदेखील बदलला आहे. याच कारणाने ही नदी कोरडी पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या नदीवरून सावर्ला, नायगाव, कोलार, जुनाड, पिंपळगाव, उकणी व वेकोलिच्या वसाहत असलेल्या प्रगतीनगर, भालर कॉलनी येथे पाणी पुरवठा होतो. परंतु वर्धा नदी कोरडी पडल्याने या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुनाड व तेलवासा या खाणीतील मातीचे ढिगारे नदीच्या दोन्ही बाजूला अगदी लागून टाकण्यात आले आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह समोर येण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे.
सातत्याने वाहणारा नदीचा प्रवाह बंद झाल्याने भालर कॉलरी व प्रगतीनगर कॉलनीमधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जुनाड घाटावरील जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पीसी मशीनद्वारे नाली खोदून नदीचे पाणी कॉलनीकडे नेण्यात येत आहे. वेकोलिच्या कोलार, जुनाड, चारगाव व नदीव जुनाड, या चार कोळसा खाणीतील ओव्हरबर्डनमुळे वर्धा नदीचे पात्र दिवसेंदिवस बुजत चालले आहे. वर्धा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी मोठमोठे दगड जमा झाले असल्याचे दिसून येत आहे.
खाणीच्या पाण्यामुळे धोका
वेकोलिच्या कोलार, जुनाड, उकणी, चारगाव, कुनाडा, माजरी या कोळसा खाणींचे पाणी थेट वर्धा नदीत जात असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. गंधक, लोह, क्षार, कार्बन, शिसे, आदी घटक पाण्याद्वारे नदीपात्रात जात आहे. सध्या नदीपात्रात पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी धोकादायक मानले जात आहे. नियमानुसार उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडत येत नाही. हा कायदेशीर गुन्हा ठरतो. परंतु कायद्याला न जुमानता रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असले तरी प्रदूषण विभाग मात्र वेकोलि किंवा अन्य उद्योगांच्या विरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
रांगणा-भुरकीने तारले
वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा होत असून रांगणा डोहातील पाणी ओढून ते ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वणी शहराला पुरविले जात आहे. विशेष म्हणजे रांगणा-भुरकी डोहात बारमाही पाणी असते. या डोहाचे पाणी कधीच आटले नाही. वणी नगरपरिषदेमार्फत या डोहावर कोट्यवधी रूपये खर्च करून पाणी पुरवठा योजना सुरू केल्याने यंदाचा उन्हाळा वणीकरांसाठी टँकरमुक्त ठरला असून त्यामुळे वणीकर जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.