वेकोलितील भंगारावर चोरट्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:37 PM2018-10-31T22:37:21+5:302018-10-31T22:37:55+5:30
वेकोलिच्या बंद असलेल्या कोळसा खाणींमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या भंगारावर चोरट्यांची पुन्हा एकदा नजर पडली आहे. बुधवारी वणी पोलिसांनी जत्रा मैदान परिसरातून जप्त केलेले अडीच लाख रूपये किंमतीचे भंगार हे वेकोलितीलच असावे, अशी शंका व्यक्त केली जात असून पोलिसांनी त्यादिशेने तपास चालविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वेकोलिच्या बंद असलेल्या कोळसा खाणींमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या भंगारावर चोरट्यांची पुन्हा एकदा नजर पडली आहे. बुधवारी वणी पोलिसांनी जत्रा मैदान परिसरातून जप्त केलेले अडीच लाख रूपये किंमतीचे भंगार हे वेकोलितीलच असावे, अशी शंका व्यक्त केली जात असून पोलिसांनी त्यादिशेने तपास चालविला आहे. तूर्तास एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
येथील जत्रा मैदान परिसरात एम.एच.३४-एम.५७४२ क्रमांकाच्या पीक-अप वाहनात चोरीचे भंगार आणण्यात आले असून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची गोपनिय माहिती वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी लगेच डी.बी.पथकाला घटनास्थळाकडे रवाना केले. त्यावेळी जत्रा मैदानात उपरोक्त क्रमांकाचे पीक-अप वाहन उभे असल्याचे दिसून आले. त्या वाहनाची झडती घेतली असता, वाहनात टिनपत्रे, मोठे लोखंडी वॉल, लोखंडी पाईप, यासह विविध लोखंडी साहित्य आढळून आले. त्याचे वजन केले असता, दोन टन ९०० किलोचे हे भंगार चोरीतील असल्याची शंका येताच, पोलिसांनी पीक-अप वाहनात बसून असलेल्या अरूण मारोती गवते (२७) रा.गोकुलनगर याला अटक केली. याप्रकरणी वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई डी.बी.पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, बाळा मोहाडे, नितीन सलाम, अमित पोयाम, दीपक वडस्कर, प्रशांत आडे यांनी केली. वणी परिसरात १२ कोळसा खाणी आहेत. त्यापैकी बहुतांश कोळसा खाणी बंद आहे. या बंद कोळसा खाणीत कोट्यवधी रूपयांचे भंगार पडून आहे. मध्यंतरी घुग्गूस, चंद्रपूर यासह वणी परिसरातील भंगार चोरट्यांच्या टोळ्यांनी अक्षरश: या कोळसा खाणींमध्ये धुडगूस घातला होता. लाखो रूपयांचे भंगार लंपास केले. ही बाब लक्षात आल्यानंतर वेकोलिची सुरक्षा यंत्रणा व पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाया करून भंगार चोरीवर नियंत्रण मिळविले होते. वणी तालुक्यातील कुंभारखणी येथील भूमिगत कोळसा खाणीतून मागील काही महिन्यात लाखो रूपयांचे भंगार पळविण्यात आले. भंगार चोरणाऱ्या या सशस्त्र टोळ्या वेकोलित शिरून सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत भंगार पळवित होते.
भंगार चोरीच्या गोरखधंद्यात गुंडांचा शिरकाव
वणी परिसरात असलेल्या वेकोलिच्या खाणीतून भंगार चोरी करण्यासाठी निर्माण झालेल्या टोळ्यांमध्ये गुुंडांचे प्रमाण अधिक आहे. या गुंडांच्या शिरावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या व्यवसायातून हे गुंड लाखोंची कमाई करीत आहेत. घुग्गूसमधील चोरट्यांची संख्या अधिक आहे.