उसाला अधिक भाव कोण देतो याकडे नजरा
By admin | Published: September 2, 2016 02:31 AM2016-09-02T02:31:39+5:302016-09-02T02:31:39+5:30
गेले कित्येक दिवस बंद असलेला गुंज येथील साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यासोबतच पोफाळी आणि मराठवाड्यातील साखर कारखानेही
कारखान्यांचा गाळप हंगाम : गुंजच्या कारखान्यातील जुन्या कामगारांचा प्रश्न ऐरणीवर
महागाव : गेले कित्येक दिवस बंद असलेला गुंज येथील साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यासोबतच पोफाळी आणि मराठवाड्यातील साखर कारखानेही महागावातून ऊस उचलण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत उसाला अधिक कोण भाव देतो, याकडे महागाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच गुंज कारखान्यातील जुन्या कामगारांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना अवसायनात आला. त्यानंतर हा कारखाना राज्य बँकेने लिलावात काढला. नॅचरल शुगरने ५४ कोटी रुपयात हा कारखाना विकत घेतला. कारखान्यातील यंत्र सामुग्रीची डागडुजी सुरू असून लवकरच साखर कारखाना सुरू होणार आहे. यासोबतच पोफाळी येथील साखर कारखानाही सुरू होईल. तसेच मराठवाड्यातील साखर कारखान्यांचीही महागावातील ऊसावर नजर असते. अशा स्थितीत उसाला कोण अधिक भाव देणार याकडे महागाव तालुक्यातील उस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. नॅचरल शुगरने अधिक भाव दिल्यास शेतकऱ्यांना सोईचे जाणार आहे. परंतु हा व्यापारी तत्वावरील साखर कारखाना शेतकऱ्यांना काय देतो याबद्दल शेतकरी साशंक आहे. सहकारी तत्वावरील पोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत आहे. गतवर्षी अत्यल्प गाळप करून हा कारखाना बंद पडला होता. त्यामुळे यंदा तो कधी सुरू होणार आणि किती गाळप करणार यासोबतच काय भाव देणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तसेच मराठवाड्यातील साखर कारखाने महागावातील उसाला काय भाव देतात हेही महत्वाचे आहे. समाधानकारक भाव मिळाल्यास शेतकरी जवळच्या कारखान्याला ऊस देऊ शकतात.
दुसरीकडे नॅचरल शुगर साखर कारखाना सुरू होण्यापूर्वीच कामगारांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामगार संघटनांची बुधवारी कारखाना साईडवर बैठक झाली. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. याबाबत कार्यकारी संचालकांना विचारणा केली असता कामगारांंना पगारापोटी दीड कोटी थकीत देणे असून ती अवसायकांना देणे असण्याची माहिती जी.व्ही. गांगणे यांनी दिली. या कारखान्यावर १०० कोटीच्यावर कर्ज आहे. जे काही देणे आहे ते आम्ही लावून घेतले आहे. त्यापैकी कामगारांचे देणे आहे, परंतु आम्हाला थेट कामगारांना पैसे न देता अवसायकांना द्यावे लागेल. एकंदरित नॅचरल साखर कारखाना सुरू होण्यापूर्वीच कामगारांचा वाद ऐरणीवर आला आहे. आता नॅचरल शुगर यातून कसा मार्ग काढते, याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)