नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे
By admin | Published: November 6, 2014 02:21 AM2014-11-06T02:21:20+5:302014-11-06T02:21:20+5:30
पुसद तालुक्यात गतवर्षीपेक्षाही पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. असे असताना प्रशासनाने नवाच जावईशोध लावत नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे दर्शविली आहे.
पुसद : पुसद तालुक्यात गतवर्षीपेक्षाही पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. असे असताना प्रशासनाने नवाच जावईशोध लावत नजर अंदाज आणेवारी ५५ पैसे दर्शविली आहे. आणेवारी अधिक दर्शवून प्रशासनाने शेतकऱ्यांना आणखी दुबळे बनविल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गात उमटत आहे. सुधारित आणेवारी घोषित करून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, त्याबरोबरच शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात पिकांची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केसुद्धा नाही. प्रशासनाने नुकतीच नजर अंदाज आणेवारी घोषित केली. त्यामध्ये ती ५५ टक्के एवढी दर्शविण्यात आली. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रशासनाचा डाव आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वे करून सुधारित नजर अंदाज आणेवारी घोषित करावी, त्यामध्ये ही आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास तालुका दुष्काळग्रस्त घोषित होवू शकतो. परिणामी शेतकऱ्यांनाही विविध योजना आणि कर्ज माफीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने ५५ पैसे आणेवारी काढून मदतीची आशा धुसर केली आहे. परिणामी या आणेवारी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळला आहे. दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि उन्हाचा तडाखा यामुळे सोयाबीन आणि कपाशीची उतारी आली नाही. उत्पादनात मोठी घट झाल्याने बियाण्यांसाठी झालेला खर्चसुद्धा हाती येणार नसल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे. नदी-नाले, तलाव, ओढे यांनी आतापासूनच तळ गाठायला सुरुवात केली आहे. काही गावांमध्ये तर आतापासूनच टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसाने खरीप हंगामानंतर आता रबीही धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यात ५५ पैसे आणेवारी काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला असल्याच्या प्रतिक्रिया आता शेतकरी वर्गातून उमटत आहे. (प्रतिनिधी)