आर्णीतून साडेआठ लाखांचे दागिने लंपास
By admin | Published: January 15, 2016 03:09 AM2016-01-15T03:09:25+5:302016-01-15T03:09:25+5:30
दोन सराफा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे १८ किलो चांदीचे दागिने आणि सोन्याच्या ५०० बेसर असा...
दोन ज्वेलर्स फोडले : १८ किलो चांदी, ५०० बेसर
आर्णी : दोन सराफा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सुमारे १८ किलो चांदीचे दागिने आणि सोन्याच्या ५०० बेसर असा आठ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आर्णी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. लागून असलेली दोन ज्वेलर्स फोडल्याची माहिती शहरात होताच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रोशनाअली मोहम्मद बैलीम यांचे न्यू साई ज्वेलर्स आणि अमन इस्ताक बैलीम यांचे सरकार ज्वेलर्स ही दोन सराफा दुकाने लागून-लागून आहेत. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दोनही दुकाने बंद करून ते घरी गेले होते. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटर वाकलेले दिसून आले. आतमध्ये बघितले असता दुकानातील दागिन्यांचे डबे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. दुसऱ्याही दुकानात हाच प्रकार दिसून आला. न्यू साई ज्वेलर्समधून चोरट्यांनी चांदीच्या तीन किलो मोठ्या पायल, फॅन्सी पायल दोन किलो, चांदीची मोठी तोरडी दोन किलो, चांदी कंगन जोड एक किलो, चांदीचे आकडे ५०० ग्रॅम, करंडी जोड ५०० ग्रॅम, चांदी ब्रासलेट ५०० ग्रॅम, देवी व गणपतीच्या मूर्ती ५०० ग्रॅम, लहान पायल, चांदीचे पेटी, अंगठी, जोडवे, कमरपट्टा, दिवे, ग्लास, चेन, घुंगरू, कानातील रिंग असे विविध प्रकारचे दागिने मिळून १८ किलो ८०० ग्रॅम चांदी लंपास केली.
याची किंमत सात लाख ८९ हजार ६०० रुपये आहे. तर सरकार ज्वेलर्समधून सोन्याच्या ५०० नग बेसर, चांदीचा डब्बा, चांदीचे ग्लास, पायपट्टी, चांदीचे कडे, जोडवे, अंगठी आणि नगदी दोन हजार असा ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरीने शहरात खळबळ उडाली असून आर्णी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. (शहर प्रतिनिधी)