खासगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:18 PM2017-10-17T23:18:59+5:302017-10-17T23:19:08+5:30
महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार मंगळवारपासून संपावर गेल्याने खासगी वाहतुकदारांची चांदी झाली. वणी आगारातून एकही बस सोडण्यात न आल्याने एकीकडे प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत, तर दुसरीकडे प्रवाशांची गरज हेरून खासगी प्रवासी वाहतुकदारांनी त्यांची चांगलीच लूट केली. कुणी दुप्पट, कुणी तिप्पट तर कुणी चौपट भाडे आकारून प्रवाशांचे खिसे रिकामे केले. या संपामुळे वणी आगाराला मंगळवारी सुमारे तीन लाखांचा फटका बसला.
वणी आगारात २८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांपैकी २५० कर्मचारी संपात उतरले आहेत. परिणामी मंगळवारी सकाळपासून वणी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. मंगळवारपासून हे कर्मचारी संपावर उतरणार आहेत, याची कल्पना नसलेले शेकडो प्रवासी सकाळी वणी बसस्थानक परिसरात आलेत. मात्र एसटी कर्मचारी संपात उतरल्याची माहिती मिळाल्याने या प्रवाशांनी खासगी वाहनांचा प्रवासासाठी आधार घेतला. शाळांना सुट्या असल्याने व दिवाळीच्या सणाला प्रारंभ झाल्याने वणी बसस्थानकावर दररोज प्रवाशांची मोठी गर्दी होते. मात्र मंगळवारी संपामुळे या प्रवाशांची चांगलीच गोची झाली. वणी-वरोरा या मार्गाचे प्रवास भाडे २५ रुपये आहे. मात्र प्रवाशांची गरज हेरून अनेक आॅटो चालकांनी वणी-वरोरा मार्गासाठी ५० रुपये घेतले. घोन्सा ते झरी या १८ किलोमिटर अंतराचे एसटी भाडे २३ रुपये आहे. मात्र आॅटो चालकांनी प्रत्येकी १०० रुपये प्रवाशांकडून वसुल केले. यामुळे खासगी वाहतूकदारांची दिवाळीच साजरी झाली.
संपात उतरलेल्या येथील कर्मचाºयांनी सकाळी घोषणाबाजी करीत निदर्शने केली. त्यानंतर दिवसभर आगार परिसरात भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळपर्यंत हा संप सुरूच होता. मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा फिस्कटल्याने मागणीच्या पूर्ततेसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. होत असलेला त्रास लक्षात घेता सदर संप मिटावा, अशी जनभावना आहे.
अन् त्या बसला परत पाठविले
संप सुरू असताना मंगळवारी सकाळी यवतमाळ येथून महामंडळाची एक बस वणी येथे पोहचताच, संतप्त संपकरी कामगारांनी सदर बस अडवून चालकाची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर ही बस वणीच्या आगारात लावण्यात आली. वातावरण शांत झाल्यानंतर बस यवतमाळ येथे परत पाठविण्यात आली.
वणी आगारात एकूण २८१ कर्मचारी असून त्यांपैकी २५० लोक संपात उतरले आहे. परिणामी वणी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. मंगळवारचा हा संप शंभर टक्के यशस्वी झाला.
-अभिजीत कोरटकर,
आगार व्यवस्थापक वणी