कृषी साहित्य विक्रेत्यांकडून महागावात शेतकर्यांची लूट
By admin | Published: June 2, 2014 01:50 AM2014-06-02T01:50:49+5:302014-06-02T01:50:49+5:30
महागाव तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडून शेतकर्यांची प्रचंड लूट
महागाव : महागाव तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडून शेतकर्यांची प्रचंड लूट होत असून कृषी अधिकार्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जादा दराने लिकिंग करून खत व बियाण्यांची विक्री होत आहे. मृगनक्षत्र अगदी तोंडावर आले आहे. शेतकरी मशागतीत व्यस्त असून कृषी केंद्रांमध्ये जाऊन खते व बि-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. शेतकर्यांची गरज लक्षात घेऊन त्यांची लूट करण्याचा सपाटा महागाव तालुक्यात चालविला आहे. तालुक्यात ६0 हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र असून ३२ हजार शेतकरी आहे. कपाशीच्या पेरणीसाठी दोन लाख बीटी बियाणे पॅकेटस्ची आवश्यकता असून १५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. तालुक्यात असलेल्या ७३ कृषी केंद्रात मोठय़ा प्रमाणात खते व बि-बियाणे आणण्यात आले आहे. मात्र या कृषी केंद्र चालकांनी अधिकार्यांना हाताशी धरुन चढय़ा भावाने विक्री चालविली आहे. कृषी केंद्रावर नियंत्रण ठेवण्याचे काम कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकार्यांचे आहे. दरमहा कृषी केंद्राला भेट देऊन त्याचा अहवाल पाठविणे गरजेचे आहे. परंतु कोणताही अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अधिकारी व कृषी केंद्र चालकांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. एखाद्या कृषी केंद्र चालकाची तक्रार करायची असल्यास अधिकारी कार्यालयात भेटत नाही. मोबाईलवर संपर्क साधायचा तर नॉट रिचेबल असतात. या सर्व प्रकारात शेतकरी अक्षरश: लुटला जात आहे. अनेक कृषी केंद्र चालकांनी गावागावांत अनधिकृत गोदाम तयार केले आहे. या ठिकाणी माल साठविला आहे. कृषी केंद्र चालकांना साठा फलक लावणे आवश्यक आहे. तसेच स्टॉक बुक अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. परंतु कोणत्याही कृषी केंद्रात साठा फलक दिसत नाही. उलट बियाणे आणि खते लिंकिंग करून जादा दराने विकले जात आहे. बियाण्यांचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता कृषी केंद्र चालकांनी अवैध साठा केला असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकर्यांची लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)