सावकार लुबाडतोय, बिनधास्त तक्रारी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:54 PM2018-02-09T21:54:02+5:302018-02-09T21:54:30+5:30
सावकार आपल्याला लुबाडत असेल, अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असेल तर त्याच्याविरुद्ध बिनधास्त तक्रारी करा, त्याच्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सावकार आपल्याला लुबाडत असेल, अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असेल तर त्याच्याविरुद्ध बिनधास्त तक्रारी करा, त्याच्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.
यवतमाळ शहरात अवैध सावकारांचा प्रचंड धुडगुस सुरू आहे. बँकांना पर्याय म्हणून अवैध सावकारीतून ईकॉनॉमी चालविली जात आहे. अडचणीत असलेल्या, गरजूंना व्याजाचे अव्वाच्या सव्वा दर आकारुन कर्ज दिले जात आहे. दुप्पट-तिप्पट परतावा देऊनही मुद्दल कायम आहे. सावकारांच्या या बाजारात फिरणाऱ्या रकमेच्या वसुलीसाठी अनेकांनी गुंड पोसले आहेत. या गुंडांच्या माध्यमातून अवैध सावकारापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने गुंडांची व अवैध सावकारांचीसुद्धा पोलीस कुंडली तयार करीत आहे.
पोलिसांनी कारवाईची तयारी चालविली असताना आता जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनीही तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. वर्धन ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, गेल्या काही महिन्यात आपण १४ ते १५ सावकारांवर एफआयआर नोंदविले आहेत. या कारवाईसाठी संबंधिताची लेखी तक्रार असणे आवश्यक आहे. स्वत:हून फिर्यादी बनून कारवाईची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळेच सावकारांकडून फसवणूक झालेल्यांनी जिल्हा उपनिबंधक अथवा तालुक्याच्या सहायक निबंधक कार्यालयाकडे बिनधास्त तक्रारी कराव्या, त्यावर योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आवाहन उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे. पोलिसांपाठोपाठ सहकार प्रशासनानेही कारवाईची तयारी दाखविली असली तरी दंडाधिकारीय अधिकार असलेल्या महसूल तसेच प्राप्तीकर खात्याला अद्यापही अवैध सावकारांवर कारवाईचा मुहूर्त सापडला नसल्याचे दिसते.
यवतमाळ शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध सावकारीत दोन टक्क्यापासून सुरू होणारा व्याजाचा दर हा ४० टक्क्याच्याही पुढे पोहोचला आहे. एक सावकार तर चक्क दहा दिवसाचे दहा टक्के असा व्याजदर लावतो आहे. लोकांना दाखविण्यासाठी व्यवसाय एक आणि प्रत्यक्षात त्याआड सावकारी असे चित्र यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी पहायला मिळते. दुकान एकाचे आणि उलाढाल भलत्याचीच असा कारभार राजरोसपणे सुरू आहे. यातूनच गोरगरिबांचा आर्थिक छळ व पिळवणूक केली जात आहे. प्रशासनातील महसूल, सहकार, पोलीस, प्राप्तीकर, विक्रीकर अशा विविध विभागांनी या अवैध सावकारांच्या मुसक्या आवळणे अपेक्षित आहे. मात्र तक्रार नाही, असे म्हणून कारवाई टाळली जात आहे. ते पाहता प्रशासनातील यंत्रणेचेही या सावकारांशी लागेबांधे नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.
जीएसटीची भीती दाखवून कच्च्या पावतीवर व्यवहार
बाजारपेठेतील वेगवेगळ्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध कारभार चालतो. जीएसटीच्या नावाने कायम बोंबा मारणाºया या व्यापाºयांचे अनेक व्यवहार रेकॉर्डवर येतच नाही. कित्येक व्यवहार तर कच्च्या पावतीनेच चालविले जातात. पक्की पावती मागितल्यास जीएसटी लागेल, अशी भीती ग्राहकांना दाखविली जाते. अशा व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून हाच पैसा अवैध सावकारीत गुंतविला जात आहे. विविध क्षेत्रातील मंडळी अवैध सावकारीच्या व्यवसायात ‘फायनान्सर’ म्हणून नावारुपास आली आहे. ब्रेक लावण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेपर्यंतही अवैध सावकारीतील लाभाचे पाट तर पोहोचले नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
डॉक्टरही फायनान्सरच्या भूमिकेत
विविध व्यवसायाआडून अवैध सावकारीमध्ये पैसा उपलब्ध करून दिला जात आहे. त्यात आता डॉक्टरही मागे नाहीत. यवतमाळ शहरातील अशाच काही डॉक्टरांची नावे अवैध सावकारांच्याच चर्चेतून पुढे आली आहे. हे डॉक्टर शहरातील अवैध सावकार, बिल्डर, रियल इस्टेट या व्यवसायासाठी फायनान्सर म्हणून भक्कमपणे उभे राहत आहेत. कुणी संपत्ती खरेदी केली आहे तर कुणी बारमध्ये दरबार भरवितो आहे. काही डॉक्टरांनी शहरातील अगदी क्रीम जागा ताब्यात घेतल्या आहेत. एका डॉक्टरने तर आपल्या दवाखान्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बिल्डरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये अवैध सावकारी व रियल इस्टेटमध्ये गुंतविले आहेत. येथील प्राचीन मंदिर रोड व परिसरातील डॉक्टर मंडळींची अवैध सावकार व बिल्डरांकडे सर्वाधिक उठबस राहत असल्याचे सांगितले जाते. या डॉक्टर कम फायनान्सरवरसुद्धा सहकार, पोलीस, प्राप्तीकर, महसूल असे शासनाचे विविध विभाग मेहेरबान असल्याचे दिसून येते. या डॉक्टरांच्या व्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, एवढे निश्चित.