जमावबंदीला पहिल्याच दिवशी खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:00 AM2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:02+5:30
यवतमाळ, पूसद आणि पांढरकवडा हे तीनही शहरे अतिधोकादायक अवस्थेत आहे. यामुळे या शहरांवर विशेष नजर ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत शहरात जमावबंदी करण्याचे आदेश लागू केले आहे. या आदेशानुसार पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर गुन्हा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा धोका जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये जमावबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी लागू केले आहेत. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र शुक्रवारी या आदेशाचे पालन होताना शहरामध्ये फारसे पहायला मिळाले नाही. शहरातील चौकाचौकांमध्ये पूर्वीप्रमाणेच गर्दीचे चित्र कायम होते. काही जणांनी मास्क लावले तर अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे विदारक चित्र पहिल्याच दिवशी पहायला मिळाले.
यवतमाळ, पूसद आणि पांढरकवडा हे तीनही शहरे अतिधोकादायक अवस्थेत आहे. यामुळे या शहरांवर विशेष नजर ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत शहरात जमावबंदी करण्याचे आदेश लागू केले आहे. या आदेशानुसार पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर गुन्हा आहे. मात्र यानंतरही शहरातील दत्त चौक, मुख्यबाजारपेठ, भाजीबाजार, शनिमंदिर चौक, कळंब चौक, भाजी मंडी, आर्णी नाका, बसस्थानक यांसह विविध भागांमध्ये पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी पहायला मिळाली. या ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांनी ग्रुपने खरेदी करतानाचे चित्र कायम होते. अनेक जण तोंडाला मास्क न लावता वस्तू खरेदी करतानाचे चित्र सर्वत्र होते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने मास्क लावले नाही अशा व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला आहे. यामुळे पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई होणे अपेक्षित होते. प्र्त्यक्षात कारवाई करणारी यंत्रणाच उपस्थित नव्हती. कारवाई करण्यासाठी तहसीलदार, एसडीओ, पोलीस विभाग, नगर परिषद यांना अधिकार देण्यात आले आहे. मात्र शासकीय सुटी असल्याने कर्मचारी कामावरच नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले. कारवाई करणारी यंत्रणा गायब असल्याने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक राहिला नाही. यातूनच मास्क न लावता नागरिक शहरात फिरताना दिसत होते.
अखेर जिल्हाधिकाऱ्यांना उतरावे लागले रस्त्यावर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. त्या अंतर्गत विविध निर्बंध घालण्यात आले आहे. बाजारपेठेची वेळ सायंकाळी ८, तर हाॅटेल-रेस्टाॅरंटची वेळ ९.३० पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. या निर्बंधाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शुक्रवारी सायंकाळी स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत फेरफटका मारला. विनामास्क दिसलेल्या ४० जणांवर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांनी बसस्थानक चाैक व इतरही भागाला भेटी दिल्या. पायी फिरून नागरिकांना निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, डाॅ. विजय अग्रवाल आदी होते. खुद्द जिल्हाधिकारी दिसल्याने मास्क टाळणाऱ्यांची भंबेरी उडाली.