जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये बुडाला ४४ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:12+5:30
जिल्ह्यातून दारू निर्मिती कारखान्यापासून मिळणारे महसुली उत्पन्न्न ५२ कोटी ९२ लाख इतके अपेक्षित आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा महसूल वसूल झाला. १८ मार्चपासून मंगरुळ येथील देशी दारू कारखान्याचे उत्पादन बंद करण्यात आले. यामुळे आतापर्यंत जवळपास सहा कोटींचा महसूल बुडाला आहे. तर दारू दुकाने बंद असल्याने ४५ दिवसात होणारी सरासरी विक्री थांबली. यामुळे ३८ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारूची निर्मिती, विक्री नैतिकदृष्ट्या वाईटच आहे. मात्र दुसरी बाजू या दारूच्या निर्मिती व विक्रीतून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळतो. त्याच आधारावर इतरही सोईसुविधा पुरविल्या जातात. दारू दुकाने बंदच्या काळात तब्बल ४४ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात दारू निर्मितीतून मिळणाऱ्या सहा कोटी महसुलाचाही समावेश आहे.
जिल्ह्यातून दारू निर्मिती कारखान्यापासून मिळणारे महसुली उत्पन्न्न ५२ कोटी ९२ लाख इतके अपेक्षित आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा महसूल वसूल झाला. १८ मार्चपासून मंगरुळ येथील देशी दारू कारखान्याचे उत्पादन बंद करण्यात आले. यामुळे आतापर्यंत जवळपास सहा कोटींचा महसूल बुडाला आहे. तर दारू दुकाने बंद असल्याने ४५ दिवसात होणारी सरासरी विक्री थांबली. यामुळे ३८ कोटी २५ लाखांचा महसूल बुडाला. शासनाला एकट्या यवतमाळ जिल्ह्यातून ४५ दिवसाच्या कालावधीत बंदमुळे ४४ कोटी २५ लाखाच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.
कोरोना विषाणू संसर्गाची महामारी आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी व विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. त्यामुळेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
दारूच्या निर्मिती व विक्रीतून राज्याच्या कोषात घसघशीत रक्कम जमा होते. याचा हिशेबही सर्वश्रृत आहे. आता सरकार आर्थिक अडचणीत असल्याने थेट केंद्रातूनच दारू दुकाने सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले.
यवतमाळ शहर वगळता जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २३ विदेशी दारूची दुकाने, १२४ देशी दारूचे दुकाने व ६२ बीअर शॉपी आहेत. ही सर्व दुकाने ५ मेपासून सुरू करण्याचे आदेश होते. हा आदेश रद्द करून आता ही सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवली जाणार आहे.
तळीरामांचा आनंद ठरला औटघटकेचा
यवतमाळ शहरातील ११ विदेशी दारू दुकाने, १९ बीअर शॉपी, ११ देशी दारू दुकाने बंद राहणार आहे. ग्रामीण भागातील दारू दुकाने सुरु झाल्यानंतर यवतमाळ शहरातील तळीरामांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळविला होता. वणी येथे विदेशी दारूचे एक दुकान व देशी दारूचे दोन दुकाने बुधवारी सकाळी ८ वाजता उघडण्यात आली होती. येथील गर्दी पाहून आतापर्यंत तळीरामांचा जीव किती कासावीस झाला हे दिसून येते. मात्र वणीतील गर्दी पाहून प्रशासनाने दारू दुकान सुरू ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला. शिवाय कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण भागात दारू विक्रीची दिलेली सूट रद्द केली. पुढील आदेशापर्यंत जिल्ह््यात सर्वच ठिकाणी मद्य विक्रीला बंदी आहे.