वणी बाजार समितीला ४२ लाखांचा तोटा
By admin | Published: June 15, 2014 11:47 PM2014-06-15T23:47:41+5:302014-06-15T23:47:41+5:30
येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाले आहे. मात्र बाजार समिती डबघाईस आल्याने दोन महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना राबत आहे. त्यांचे वेतन देण्यास निधी
वणी : येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाले आहे. मात्र बाजार समिती डबघाईस आल्याने दोन महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना राबत आहे. त्यांचे वेतन देण्यास निधी नसल्याने नवनियुक्त प्रशासकीय मंडळ या बुडत्या जहाजाला कसे तारतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या दोन वर्षांपासून तोट्यात आहे़ वणीत खासगी बाजार समितीला परवानगी देण्यात आल्याने शासकीय बाजार समितीवर अवकळा आली आहे. या समितीचा आर्थिक स्त्रोत घटला आहे. शेतकरी, व्यापारी, दलाल सर्वांनीच या समितीकडे पाठ फिरविली. परिणामी ही शासकीय बाजार समिती केवळ धान्य बाजाराचा ‘सेस’ व गोडाऊन भाडे यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच आपला गाडा हाकलत आहे. या समितीला पूर्णवेळ सचिव मिळाल्याने त्यांनी उत्पन्न वाढीसाठी धडपड सुरू केली. तथापि कायद्यातील बगलवाटांसमोर ते हतबल झाले आहे.
या बाजार समिती संचालकांचा कार्यकाळ संपल्याने शासनाने त्यांना मुदतवाढ न देता प्रथम प्रशासक नेमला़ या प्रशासकाला बाजार समितीची गाडी रूळावर आणता आलीच नाही़ अखेर आपल्या रिकाम्या कार्यकर्त्यांना हक्काची खुर्ची मिळावी म्हणून आमदार वामनराव कासावार यांनी शिफारस करून आपल्या कार्यकर्त्यांचे १७ सदस्यीय प्रशासक मंडळ समितीवर बसविले़ यापूर्वीचे संचालक मंडळही काँग्रेसचेच होते़ मात्र ते आमदारांच्या विरोधी गटातील होते़ त्यामुळे जुन्या संचालक मंडळातील कुणालाच नवीन प्रशासकीय मंडळात संधी मिळाली नाही़ नवे प्रशासकीय संचालक मंडळ आगामी विधानसभा निवडणुकीत आधार देईल, असा आमदारांचा कयास असावा़ यावर्षी बाजार समितीला ८३ लाख ९३ हजार १६० रूपयांचे उत्पन्न झाले़ कर्मचारी वेतन, इलेक्ट्रीक देयक, टेलिफोन देयक, विविध कर, या आवश्यक खर्चासह ईतर खर्च मिळून एक कोटी २६ लाख १७ हजार ४९९ रूपये खर्च झाला. मात्र त्या मानाने उत्पन्न कमी झाले. उत्पन्न कमी अन् खर्च जादा, अशी बाजार समितीची गत झाली आहे. समितीचा गाडा हाकताना मंडळाच्या नाकीनऊ येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)