चार दिवसांत तीन हजार हेक्टरचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 05:00 AM2021-08-22T05:00:00+5:302021-08-22T05:00:11+5:30
जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तीन हजार हेक्टरचे नुकसान केले आहे. पुरात दोनजण वाहून गेले, तर अनेक घरांत पाणी शिरल्याने अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, नुकसानीची नोंद करण्यासाठी ७२ तासांचा कालावधी विमा कंपनीने दिला आहे. त्यासाठी लोकेशनसह नुकसानीचे क्षेत्र दाखवावे लागते. याबाबतची माहिती कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र, हा फोन रिसिव्हच होत नव्हता. तक्रारी ऑनलाईन नोंद करताना सर्व्हरही डाऊन असल्याचे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. गत चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी १३५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आला आणि शेतशिवार खरडून गेले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, कळंब, वणी, घाटंजी, दिग्रस आठ तालुक्यांत नुकसानीची नोंद करण्यात आली. नदी आणि नाल्याच्या पात्रात आलेल्या पुराने दोन व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली आहे. या पावसात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असून, चार जनावरेही वाहून गेली. अनेक सखल भागात पुराचे पाणी साचले. यातून उत्पन्नाला मोठा फटका बसणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक पाऊस आल्याने शेतात दलदल निर्माण झाली आहे.
किडींचा प्रादूर्भाव
- ढगाळी वातावरणासह बदलत्या हवामानाने किडीला पोषक असे वातावरण मिळत आहे. यामुळे पिकांवरील किडी जोर काढण्याची शक्यता आहे. यामुळे उघाड पडताच शेतकऱ्यांना किडींपासून संरक्षण मिळावे म्हणून उपाययोजना कराव्या लागणार आहे.