प्लास्टिक पिशवी बंदीला व्यापाऱ्यांचा खो
By admin | Published: March 18, 2017 12:54 AM2017-03-18T00:54:36+5:302017-03-18T00:54:36+5:30
नगरपरिषदेने प्लास्टिक बंदीचा नारा देत प्रभावी राबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र या मोहिमेला आता
पुसद शहर : नगरपरिषदेचे दुर्लक्ष, मोकळ्या मैदानात पिशव्यांचा खच
पुसद : नगरपरिषदेने प्लास्टिक बंदीचा नारा देत प्रभावी राबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र या मोहिमेला आता व्यापारी व नागरिकांकाडूनच खो दिला जात आहे. प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याने शहरात प्लास्टिकचे साम्रज्य वाढले आहे.
पुसद शहर चोहोबाजूने मोठ्या प्रमाणात वाढले. शहराच्या अवतीभोवती छोटे-मोठे भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. भंगार व्यावसायिकांनी साठवून ठेवलेले प्लास्टिक पिशव्यांमुळे शहर प्लास्टिकमय झाले आहे. शहरातील खुल्या जागांवर प्लास्टिक मोठ्या प्रमाणात विखुरलेले दिसते. शहर पन्नीमुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तसेच प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा संकल्प केला. पर्यावरणाला धोका असलेली प्लास्टिक पन्नीचा वापर करू नका, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने जोरदार जनजागृती केली होती. प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईसुद्धा केली होती. परंतु सध्या नगरपरिषद प्रशासनाची कठोरता काहीशी शिथील झाल्याने पुन्हा एकदा पुसद शहरात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. नव्याने रुजू झालेले नगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय पुढे चालू ठेवावा, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक व व्यापाऱ्यांनी पुन्हा प्लास्टिक पिशवीचा वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे.
पर्यावरणाला व शहराला घातक असलेल्या प्लास्टिक पिशवीचा वापरसुद्धा जोरात सुरू आहे. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, दुकानदार यासह व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना प्लास्टिक पिशवी दिली जाते. पुन्हा एकदा प्रभावी अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)