पुसद शहरात प्रेमप्रकरणातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:09+5:30
शिवाजी वार्डातील एका विवाहितेसोबत शेख अख्तरचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अख्तर हासुद्धा विवाहित असून त्याला दोन अपत्य आहे. प्रेयसी माहेरी आली असल्याचे समजताच शेख अख्तरने सोमवारी रात्री तिच्या घरासमोर जाऊन रिव्हॉल्वरमधून जमिनीवर एक राऊंड फायर केला. पतीसोबत फारकत घेऊन माझ्याशी लग्न कर असे अख्तरचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : विवाहित प्रेयसीच्या घरासमोर गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न प्रियकराने केला. त्याला शहर पोलिसांनी चार बुलेट व रिव्हॉल्वरसह अटक केली. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजता शिवाजी वार्डातील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली.
शेख अख्तर उर्फ समीर शेख मुख्तार (३०) रा. अकरतनगर (रामरहीमनगर) पुसद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक मोठे गुन्हे नोंद आहे.
शिवाजी वार्डातील एका विवाहितेसोबत शेख अख्तरचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अख्तर हासुद्धा विवाहित असून त्याला दोन अपत्य आहे. प्रेयसी माहेरी आली असल्याचे समजताच शेख अख्तरने सोमवारी रात्री तिच्या घरासमोर जाऊन रिव्हॉल्वरमधून जमिनीवर एक राऊंड फायर केला. पतीसोबत फारकत घेऊन माझ्याशी लग्न कर असे अख्तरचे म्हणणे आहे. यासाठी त्याने फायर करून प्रेयसीच्या मनात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत रात्रभर संपूर्ण शहर अनभिज्ञ होते. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा एक तरुण हातात रिव्हॉल्वर घेऊन शिवाजी वार्डात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार प्रमेश आत्राम, सहायक पोलीस निरीक्षक रत्नपारखी व इंगोले, जमादार दीपक ताठे तसेच डीबी पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र आरोपी पसार झाला. दुपारी ४ वाजता शेख अख्तरला उमरखेड मार्गावरील हत्ती पुलावर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यावेळी शेख अख्तरने पोलिसांवरच रिव्हॉल्वर ताणल्याची माहिती आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी शेख अख्तरविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
दोन आधार कार्ड, दोन जन्मतारखा
शेख अख्तर शेख मुख्तार हा कुख्यात गुंड असून त्यावर अनेक गुन्हे नोंद आहे. त्याच्याकडे दोन आधार कार्ड असून एका कार्डवर शेख समीर कुरेशी तर दुसऱ्या कार्डवर शेख अख्तर शेख मुख्तार असे नाव आहे. दोन्हीवर वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. त्याने रिव्हॉल्वर कोठून आणली याचा शोध पोलीस घेत असल्याचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी सांगितले.