प्रेयसीसमोरच प्रियकराने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 02:41 PM2020-12-23T14:41:50+5:302020-12-23T14:45:13+5:30
Yawatmal news यवतमाळ शहरालगतच्या जामडोह येथील विवाहित प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी भिसनी शिवारातील जंगलात जात होते. दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरालगतच्या जामडोह येथील विवाहित प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी भिसनी शिवारातील जंगलात जात होते. नेहमीप्रमाणे हे युगुल २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या ठराविक जागेवर गेले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादात संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा घटनाक्रम प्रेयसीने ग्रामीण पोलिसांपुढे कबूल केल्याने खुनाच्या संशयाच्या मळभट दूर झाले.
शब्बीर जुम्मा लालनवाले (३८) रा. जामडोह असे मृत प्रियकराचे नाव आहे. त्याचे गावातील ३५ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या अनैतिक संबंधाचे बिंग फुटले. शब्बीरच्या कुटुंबीयांना ते माहीत झाल्याने त्याला समजावून सांगितले जात होते. शब्बीर दुचाकीने २१ डिसेंबरच्या दुपारी प्रेयसीला घेऊन भिसनी जंगलातील एका दरीत उतरला. त्यांचे ते नेहमीचे ठिकाण होते. शब्बीर दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. तेव्हा मंगळवारी शब्बीरची दुचाकी भिसनी जंगलात आढळली. काही अंतरावर दरीमध्ये त्याचे प्रेत दिसले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रेमसंबंधाचा प्रकार असल्याचेही कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते. सुरुवातीला खुनाचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र शब्बीरची प्रेयसी पोलिसांच्या हाती लागताच तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
शब्बीरने मद्यप्राशन केले, नंतर त्याच दारूची बॉटल फोडून काचाने डाव्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही. त्याने प्रेयसीच्या गळ्यातील ओढणी घेवून झाडाला गळफास लावला. त्याच्या प्रेयसीने त्याचा गळफास काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ते शक्य झाले नाही. शेवटी तिने काचाने ओढणी चिरली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शब्बीरचा मृत्यू झाल्याचे पाहून तिनेही त्याच्या कंबरेचा पट्टा तोडून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला गळफास लागला नाही. घाबरलेल्या अवस्थेत ती पळून गेली, असा जबाब ग्रामीण पोलिसांनी नोंदविला आहे. शिवाय शवविच्छेदन अहवालानुसार शब्बीरचा मृत्यू हा गळफास लागल्याने झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या हातावरील जखमा या स्वत:च केल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याच आधारावर ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे, अशी माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांनी दिली.