ग्रामीण भागातील कमी उंचीचे पूल ठरले डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:32+5:302021-08-20T04:48:32+5:30
बिजोरा : महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील कमी उंचीचे पूल धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात अल्पशा पावसातही पाणी पुलावरून वाहत असल्याने ...
बिजोरा : महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील कमी उंचीचे पूल धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात अल्पशा पावसातही पाणी पुलावरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटत आहे.
मुडाणा ते गौळ मुख्य रस्त्याला जाेडणाऱ्या धारमोहा ते धारेगाव रस्त्यावर पूल आहे. सेनंदकडे जाणाऱ्या व धारेगावकडे जाणारा पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी एका युवकाचा पाण्याचा प्रवाहात वाहून मृत्यू झाला होता. तसेच कोठारी गावावरून राज्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील दोन पूल कमी उंचीचे आहे. नागपूर राज्य मार्गाला जोडणारा बेलदरी रस्त्यावरी पूलही कमी उंचीचा आहे. घानमुखकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अरुंद व कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नेहमी वाहतूक विस्कळीत होते.
या पुलांवरून मार्ग काढताना धोका पत्करून जावे लागते. विद्यार्थी व शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो किंवा पूर कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागते. लोकप्रतिनिधी नेहमी आश्वासने देतात. मात्र, पूर ओसरताच त्यांची आश्वासनेही विरून जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांची पाहणी करून नवीन उंच पूल देण्याची मागणी गावकरी करीत आहेत.