पाच वर्षांत सर्वात कमी पाऊस
By Admin | Published: July 23, 2014 11:51 PM2014-07-23T23:51:26+5:302014-07-23T23:51:26+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृग नक्षत्रास दीड महिना उलटूनदेखील पावसाच्या सरासरीने शंभरीसुद्धा गाठली नाही. जिल्ह्यात आघाडीवर राहणारा पुसद तालुका पावसाच्या बाबतीत सर्वात मागे पडला
नदी-नाले कोरडे : पावसाने सरासरी शंभरीही गाठली नाही
अखिलेश अग्रवाल - पुसद
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृग नक्षत्रास दीड महिना उलटूनदेखील पावसाच्या सरासरीने शंभरीसुद्धा गाठली नाही. जिल्ह्यात आघाडीवर राहणारा पुसद तालुका पावसाच्या बाबतीत सर्वात मागे पडला असून गेल्या पाच वर्षात प्रथमच पावसाने नीच्चांक गाठला आहे. तालुक्यातील नदी-नाले कोरडे असून प्रकल्पातही जलसंचय वाढला नाही.
पुसद तालुक्यात दीड महिन्याच्या खंडानंतर १९ जुलैपासून पावसाची रिमझीम सुरू आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यातील दिवसांपैकी तालुक्यात सरासरी १५ दिवस व ८१५ मिमी पावसाची सरासरी असते. यावर्षी यातील दीड महिन्याच्या कालावधी कोरडा गेला आहे. यातही पडलेल्या पाऊस पर्जन्यमापकामध्ये नोंदला गेला असला तरी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्यामुळे केवळ आजच्या २२ जुलैपर्यंत केवळ ५६ मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या पाच वर्षात वार्षिक सरासरी ओलांडली नाही, असे झाले नाही. पावसाची अवकृपा कधीही झाली नसल्याने उत्पादनाच्या बाबतीत पुसद तालुका नेहमीच आघाडीवर असतो.
गेल्या पाच वर्षाची पावसाची आकडेवारी बघितली तर २०१० मध्ये १६ जून रोजी पावसाला सुरुवात झाली होती. १ जुलैपर्यंत १४१ मिमी पाऊस झाला होता. १ जुलै रोजी पूस नदीला पूर आला होता. २०११ मध्ये १४ जूनला पावसाला सुरुवात होऊन २६ जूनपर्यंत १०९ मिमी पाऊस झाला होता. २० जुलैपर्यंत ३०४ मिमी पाऊस झाला होता. २०१२ मध्ये १० जून रोजी मृगाचा पाऊस बरसला. १८ जूनपर्यंत १८८ मिमी पावसाची नोंद झाली. २०१३ रोजी ६ जून रोजी मृगाचा पाऊस झाला. १४ जून रोजी पूस धरण ओव्हर-फ्लो झाले होते. १६ जुलैपर्यंत ४६१ मिमी पाऊस झाला होता.
यावर्षी २०१४ मध्ये ८ जुलै रोजी दमदार पाऊस झाला पण आज २२ जुलैपर्यंत केवळ ५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाच वर्षात प्रथमच जुलै महिना संपत आला असताना पावसाने शंभरी गाठली नाही. दरम्यान, चार वर्षात वरूण राजाने कधीही नाराज केले नाही. विशेष म्हणजे चार वर्षात मृग नक्षत्रातच पावसाचे आगमन झाले होते. गतवर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पाऊस झाला होता. १४ जून रोजी पूस धरण ओव्हर-फ्लो झाले होते. गेल्या १९९२ ते २०१३ या २१ वर्षात १७ वेळा पूस धरण ओव्हर-फ्लो झाले आहे. अधिक वेळा म्हणजे ११ वेळा धरण आॅगस्ट महिन्यातच ओव्हर-फ्लो झाले. जुलै महिन्यात धरण दोन वेळा ओव्हर-फ्लो झाले.
गतवर्षी पावसाच्या पहिल्या आठवड्यात नदी-नाले-ओढे एक झाले होते. यंदा गतवर्षीच्या उलट स्थिती आहे. पावसाच्या आगमनासाठी प्रार्थना करावी लागली. आता चार दिवसांपासून पावसाला प्रारंभ झाला. मात्र तो रिमझीम स्वरूपाचा आहे. चार दिवसांपासून झडी असताना नदी-नाले कोरडेच दिसत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.