फेब्रुवारीत १० वर्षातील सर्वात कमी तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:54 PM2019-02-09T23:54:44+5:302019-02-09T23:57:32+5:30
आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान खाली आले.
गत ५० वर्षात सर्वात मोठा थंडीचा मुक्काम जिल्ह्यात राहिला आहे. फेब्रुवारी महिना आला तरी थंडी हलायला तयार नाही. फेब्रुवारीतील तापमान २१ अंशाच्या वर आजपर्यंत राहिले आहे. मात्र यंदा गत १० वर्षातील सर्वात कमी तापमान फेबु्रवारीत शनिवारी नोंदविण्यात आले. जिल्ह्याचे तापमान १० अंश सेल्सीयसपर्यंत खाली आले आहे. मागील १० वर्षांच्या तुलनेत हे तापमान १० अंशाने घसरले आहे. ही उलथापालथ ‘क्लायमेट चेंज’चा मोठा फटका बसणार असे संकेत देणारी आहे. याचा पहिला वार कृषी अर्थव्यवस्थेवर होण्याचा धोका आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान खाली आले. साधारणत: नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या बरोबरीचे हे तापमान आहे.
उत्तरेकडील थंड वारे विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. ते ताशी ३५ ते ४० किलोमिटर वेगाने वाहत आहे. विदर्भ हा उष्ण कटीबंधीय प्रदेश आहे. या भागात फेब्रुवारीत तापमान जास्त असते. मात्र थंडीची लाट या भागात धडकली आहे. यामुळे उष्ण आणि थंड वारे एकत्र आले आहे. या स्थितीत ढगाळी वातावरण तयार होऊन गारपीट होण्याचा धोका आहे. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांना धोका होण्याची शक्यता आहे.
अवेळी घसरलेल्या तापमानाचा फटका उन्हाळी लागवडीला बसला आहे. जानेवारी महिन्यात होणारी तिळ आणि भुर्ईमुगाची लागवड थंडीच्या मुक्कामाने लांबली आहे. फेब्रुवारी महिन्यात लागवड केली तर हे पीक पावसाळ्याच्या तोंडावर निघण्याची शक्यता आहे. मग मशागत कधी करायची आणि पुढील कामकाज कसे आटपायचे, हा पेच निर्माण होणार आहे.
भुईमूग आणि तीळ लागवडीला १५ अंशापेक्षा जास्त तापमानाची गरज आहे. थंडीत बियाण्याची उगवण होत नाही. यामुळे हे दोनही क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. ज्या शेतकºयांना तापमानाचा अभ्यास नाही, त्यांनी कालावधी संपत आहे म्हणून पेरणी केली तर थंडीने पीक उगवणार नाही. यासोबतच भाजीपाला व फुल पिकांचेही थंडीने काही प्रमाणात नकसान झाले आहे. या थंडीमुळे आजाराचे प्रमाण वाढले असून उन्हाळ्यात स्वेटर बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. थंडीने चहाचा गल्लाही दुप्पट केला आहे. या थंडीने पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक पिकांचे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा हा परिणाम पुढील काळात वाढताच राहणार आहे. याकरिता प्रत्येकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण समृद्धीच्या दृष्टीने पावले उचलावी लागणार आहे. हाच यावरचा एकमेव उपाय आहे.
- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक, चंद्रपूर