लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 09:49 PM2020-02-26T21:49:51+5:302020-02-26T21:51:11+5:30

मुळात माणसाने माणसाशी बोलणे हेच खूप आवश्यक आहे. त्यातही बोलताना मायबोलीचा अंगीकार केला तर दुधात साखरच. भाषा टिकली तर, आपण टिकू. नव्हे, भाषा टिकविणे ही आपलेच कर्तव्य आहे. ही जबाबदारी जाणूनच ‘लोकमत’ने ‘मराठीत बोला ना’ हे अत्यावश्यक अभियान सुरू केले आहे.

Lucky us luck, speaks Marathi ..! | लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..!

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..!

googlenewsNext
ठळक मुद्देआयएएस-आयपीएसची कृतज्ञता : ज्यांच्या समस्या सोडवायच्या, त्यांच्याशी संवाद झालाच पाहिजे

अविनाश साबापुरे। रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्राची राजभाषा मराठी.. त्याहून महत्त्वाचे म्हणजे बहुतांश लोकांची तर मराठीच मायबोली. तरीही मराठी बोलता-बोलताच मध्येच इतर भाषांची उसनवारी करण्याची टूम निघाली आहे. पण जिल्ह्यात आलेल्या हिंदीभाषिक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी मात्र आपली मूळ भाषा किंचित बाजूला ठेवत स्थानिक मराठी भाषा बोलण्यावर भर दिला आहे. एवढेच काय, तर मराठी बोलायला मिळणे हे आमचे भाग्य आहे, अशी कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून झळकते.
गुरुवारी महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा होतोय. त्यानिमित्त मराठी मुलखात सेवा देणाऱ्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांशी साधलेला हा अस्सल मराठी संवाद... भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचा अर्थच हा की, भारताच्या कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची तयारी. मग उत्तर प्रदेशातली व्यक्ती आंध्र प्रदेशात किंवा आंध्र प्रदेशातली व्यक्ती मध्य प्रदेशात जाऊ शकते. महाराष्ट्रात विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात तर अनेक हिंदी भाषिक आयएएस अधिकारी येतात. सध्याही सेवारत आहेत. खुद्द जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन हे अधिकारी परप्रांतीय हिंदीभाषिक आहेत. तरीही ते जाणीवपूर्वक आणि अभिमानाने मराठीतच बोलतात. निवेदने घेऊन येणाऱ्या सामान्य माणसांशी बोलताना त्यांचा मराठीचा लहेजा किंचित इकडे-तिकडे होत असेल कदाचित. पण मराठी माणसाशी मराठीतच बोलण्याचा त्यांचा आग्रह कायम असतो. ज्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत, त्या माणसांची भाषा आपल्याला आलीच पाहिजे, हा आयएएस अधिकाऱ्यांचा कर्तव्यमंत्र आहे.
मराठी भाषा दिनी, मराठी बोलीविषयी काय म्हणतात हे अधिकारी? वाचा त्यांच्याच शब्दात...

मुळात माणसाने माणसाशी बोलणे हेच खूप आवश्यक आहे. त्यातही बोलताना मायबोलीचा अंगीकार केला तर दुधात साखरच. भाषा टिकली तर, आपण टिकू. नव्हे, भाषा टिकविणे ही आपलेच कर्तव्य आहे. ही जबाबदारी जाणूनच ‘लोकमत’ने ‘मराठीत बोला ना’ हे अत्यावश्यक अभियान सुरू केले आहे. सर्व स्तरातून त्याला प्रतिसादही मिळतोय. आज मराठी राजभाषा दिनी पुन्हा एकदा त्याची आपुलकीने आठवण करून देतोय.. ‘मराठीतच बोला ना’!

मराठीचा गोडवा अनेकांना मराठीच्या प्रेमात पाडतो. मराठी भाषा समृद्ध आहे. मी मराठी पुस्तके वाचली आहे. मराठीला समृद्ध वारसा लाभला आहे. मी मराठीचा चाहता आहे.
- एम.देवेंद्र सिंह, जिल्हाधिकारी, यवतमाळ

इंग्रजी इतकीच मराठी महत्वाची आहे. मराठीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. आपले विचार मातृभाषेतूनच समृद्ध होतात. मी २०१५ पासून मराठी शिकायला सुरुवात केली.
- जलज शर्मा , सीईओ जिल्हा परिषद, यवतमाळ

मराठी ही माझी भाषा कधी झाली कळलेच नाही. २०१२ पासून मी मराठी शिकायला सुरुवात केली. आता मी अस्खलीत मराठी बोलतो. माझ्या घरातले वातावरण मराठीमय झाले. माझ्या मुलीही मराठी बोलतात.
- एम. राज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ

प्रशासनात चांगली पकड निर्माण करायची असेल तर मराठीवर प्रभूत्व निर्माण केले पाहिजे. मी मूळचा उत्तर भारतीय आहे. मला मराठीचा सार्थ अभिमान आहे. मी प्रत्येकांशी मराठीत बोलतो.
- नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ.

आज अनेक लोक बदलत्या काळानुसार स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकत आहेत. यात काहीच वाद नाही. माणूस कुठेही असो पण आपल्या मातीशी आणि आपल्या भाषेशी जोडलेला असला पाहिजे.
- भाग्यश्री विसपुते,
सहा. जिल्हाधिकारी, पांढरकवडा

समृद्ध मराठीचा वारसा चित्रपटांनी व्यापक केला आहे. मराठी समजून घेणे फार सोपे आहे. अन्य भाषांच्या तुलनेत मराठी व्यापक आहे. त्याचे साहित्य अन्य भाषेत न आल्याने व्यापकता इतरत्र पोहोचली नाही.
- अनुराग जैन , सहा. पोलीस अधीक्षक, पुसद

Web Title: Lucky us luck, speaks Marathi ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी