सुपर स्पेशालिटीच्या धर्तीवर अतिदक्षता कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 09:59 PM2017-08-03T21:59:55+5:302017-08-03T22:00:27+5:30
मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही लाजवेल असा सुसज्ज आणि वातानुकूलित अतिदक्षता कक्ष येथील शासकीय रूग्णालयात निर्माण झाला आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही लाजवेल असा सुसज्ज आणि वातानुकूलित अतिदक्षता कक्ष येथील शासकीय रूग्णालयात निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील रूग्णांना त्याचा लाभ होत आहे.
शासकीय रूग्णालयाचे नाव घेतले की, श्वास नकोसा करणारी दुर्गंधी... थुंकीच्या पिचकाºया... काळवंडलेल्या भिंती.. घरघर करणारे पंखे आणि त्यापेक्षा रूग्णांचा त्रागा करणारे डॉक्टर-कर्मचारी असे दृश्य नजरेसमोर येते. कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच असा अनुभव येतो. प्रसन्न वातावरणात डॉक्टर, कर्मचारीसुद्धा मन लावून काम करतानाचे दृष्य अभावानेच पहायला मिळते. मात्र आता यात बदल होत असून येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता उपचार कक्षात (आयसीसीयू) मोठा बदल झाला आहे. यामुळे या कक्षात येताच कुणालाही सुपर स्पेशालिटी रूग्णालयात आल्याचा भास होत आहे. शासकीय रूग्णालयात अधिष्ठात्यांच्या कक्षासमोरच नवीन आयसीसीयू साकारण्यात आला आहे. या कक्षात १२ बेडची व्यवस्था असून संपूर्ण कक्ष वातानूकूलित आहे. त्यात नऊ सेंटर मॉनिटरींग युनिट, तर दोन व्हेंटींलेटर आहे. हृदयरूग्ण आणि तापाने गंभीर रूग्णंवर येथे उपचार केला जातो. विषबाधा व सर्पदंशाच्या रूग्णांवर जुन्या आयसीसीयूमध्ये उपचाराची सुविधा आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी डॉक्टर, नर्स यांच्यावरील ताण कमी झाला.
बंदूकधारी सुरक्षा रक्षकाचा खडा पहारा
मेडिसीन विभागांतर्गत हा आयसीसीयू कक्ष असून त्याचा दर्जा वृद्धींगत करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड व विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी परिश्रम घेतले. नवीन आयसीसीयूचा दर्जा कायम राहावा, यासाठी कठोर नियम तयार केले गेले आहे. त्यानुसार रूग्णासोबत या कक्षात एकाही नातेवाईकाला थांबू दिले जात नाही. केवळ अतिशय गंभीर रूग्णाजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची सूट आहे. बंदुकधारी सुरक्षा रक्षकाचा पहारा असल्याने गर्दीही होत नाही. या कक्षाचा दर्जा कायम राहावा, यासाठी रूग्णालय प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज आहे.