पेरणीच्या तोंडावर महाबीजचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:11+5:30

खासगी कंपन्यांच्या तुलनेत शासकीय कंपनी असलेल्या महाबीज कंपनीकडून जाहीर होणाऱ्या दरावरच इतर बियाण्याचे दर ठरतात. यावर्षी महाबीजचा बियाण्याचा दर ३६०० रुपये बॅग आहे. तर खासगी कंपन्यांचा दर चार हजार ते साडेचार हजार दर आहे. ३० किलो बियाण्यांसाठी इतके मोठे दर कंपन्या आकारत आहेत. अशा परिस्थितीत महाबीजकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. प्रत्यक्षात बाजारपेठेत बियाणे आलेच नाही. यावर्षी ११ हजार क्विंटल प्रमाणित बियाणे मिळणार असल्याचे  सांगण्यात आले.

Mahabeej's planning collapsed at the time of sowing | पेरणीच्या तोंडावर महाबीजचे नियोजन कोलमडले

पेरणीच्या तोंडावर महाबीजचे नियोजन कोलमडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाबीज कंपनीच्या मार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून हे विशेष नियोजन आहे. कधीकाळी ३५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला मिळाले होते. यावर्षी केवळ अडीच हजार क्विंटल बियाणे महाबीजने पुरविले आहे.  
कापसाच्यानंतर सर्वात मोठे पीक क्षेत्र सोयाबीनचे आहे. यासाठी अनेक कंपन्या बाजारात बियाणे वितरणासाठी उतरल्या आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, सोबतच दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळावे म्हणून महाबीज कंपनी पुढाकार घेत आहे. यावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. बीजोत्पादन कार्यक्रम आणि प्रमाणित बियाणे या माध्यमातून फार मोठे क्षेत्र महाबीजच्या बियाण्यातून कव्हर होते. 
खासगी कंपन्यांच्या तुलनेत शासकीय कंपनी असलेल्या महाबीज कंपनीकडून जाहीर होणाऱ्या दरावरच इतर बियाण्याचे दर ठरतात. यावर्षी महाबीजचा बियाण्याचा दर ३६०० रुपये बॅग आहे. तर खासगी कंपन्यांचा दर चार हजार ते साडेचार हजार दर आहे. ३० किलो बियाण्यांसाठी इतके मोठे दर कंपन्या आकारत आहेत. अशा परिस्थितीत महाबीजकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. प्रत्यक्षात बाजारपेठेत बियाणे आलेच नाही. यावर्षी ११ हजार क्विंटल प्रमाणित बियाणे मिळणार असल्याचे  सांगण्यात आले. प्रत्यक्षात पाच हजार क्विंटल बियाणे यवतमाळ जिल्ह्याला मिळणार आहे. 
यातही अडीच हजार क्विंटल बियाणेच जिल्ह्यात दाखल झाले आहे. यातून महाबीज कंपनी कार्यालयात  येणारा प्रत्येक शेतकरी बीजोत्पादनासाठी थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्हाला बियाणे हवे होते, असे सांगत आहे; मात्र वरूनच प्रोग्राम नसल्याने आम्ही असमर्थ आहोत, असे उत्तर  ऐकायला मिळत आहे.  
गतवर्षी १२ हजार क्विंटल बियाणे मिळाले होते. २०१९ मध्ये २७ हजार क्विंटल बियाणे मिळाले. त्याच्या आधी ३५ हजार क्विंटल बियाणे मिळाले; मात्र यंदाच महाबीजने बियाण्याचा कोटा यवतमाळसाठी कमी का केला, हा संशोधनाचा विषय आहे. 

शेतकरी आत्महत्यग्रस्त जिल्ह्यात चिंता वाढली
- शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला अनुदानावर बियाणे देणाऱ्या महाबीज कंपनीने अचानक हा पवित्रा का घेतला, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या जिल्ह्यावर  मेहेरनजर असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याच्या वाट्याला फार कमी बियाणे आले आहे. यामुळे  जिल्ह्यातील चिंता वाढली आहे. 
३०० हेक्टरवर बीजोत्पादन
- यावर्षी ३०० हेक्टरवरच बीजोत्पादन मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी २२५ क्विंटल बियाणे जिल्ह्याकडे वळते झाले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमासाठी अनेक शेतकरी तत्पर आहेत; मात्र त्यांना बियाणे मिळणार नाही, असे स्पष्ट सांगितले जात आहे.  ठराविक शेतकऱ्यांनाच हे बियाणे उपलब्ध झाले आहे. नियमित कार्यक्रम राबवित असल्याने या शेतकऱ्यांना ही बियाणे मिळाली आहेत. मग नवीन शेतकऱ्यांनी हा प्रयोग करू नये का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

अतिवृष्टी आणि उन्हाची तीव्रता यामुळे बीजोत्पादनाचा कार्यक्रम कमी झाला आहे. पुरेसे बियाणे उपलब्ध नाही. जिल्ह्याला मिळणाऱ्या बियाण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडूनच नियोजन करण्यात आलेेले आहे. 
- अशोक ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक महाबीज, यवतमाळ.

 

Web Title: Mahabeej's planning collapsed at the time of sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती