महागाव कसबात २०० घरांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:41 PM2017-09-15T23:41:57+5:302017-09-15T23:42:14+5:30
दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे शुक्रवारी सकाळी तब्बल तीन तास बरसलेल्या पावसाने नाल्याला पूर आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव कसबा : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे शुक्रवारी सकाळी तब्बल तीन तास बरसलेल्या पावसाने नाल्याला पूर आला. या पुराचा तडाखा नदी तिरावरील सुमारे २०० घरांना बसला. पूर एवढा मोठा होता की, अनेक जण जीव मुठीत घेऊन आश्रयाला गावात आले.
दारव्हा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस झाला आहे. प्रत्येक जण पावसाची प्रतीक्षा करीत आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली. तब्बल तीन तास कोसळलेल्या या पावसाने गावालगतच्या नाल्याला पूर आला. नाल्याच्या तिरावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, गुडघाभर पाणी घरात गेल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन गावात आश्रयाला आले. आनेकांच्या घराची पडझड झाली असून, गावातही या पावसाने हाहाकार केला. अनेकांच्या घरातील धान्य व इतर साहित्य ओले झाले. पूर ओसरल्यानंतर अनेक जण आपल्या घरातील साहित्याची जुळवाजुळव करीत होते. पूरग्रस्त भागाची पाहणी दारव्हा पंचायत समितीच्या सभापती उषा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य, राधा थरकडे, उपसभापती पंडीत राठोड, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, प्रेमसिंग चव्हाण, प्रमोद यंगड, उदय राठोड यांनी केली.