एसपींच्या आदेशाचे महागाव पोलिसांना वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:42 AM2021-03-18T04:42:00+5:302021-03-18T04:42:00+5:30
अनेक गंभीर गुन्ह्यांतील तपास रेंगाळला आहे. मटका, जुगार, अवैध धंदे, गावठी दारू त्वरित बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ...
अनेक गंभीर गुन्ह्यांतील तपास रेंगाळला आहे. मटका, जुगार, अवैध धंदे, गावठी दारू त्वरित बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले. गंभीर गुन्ह्यातील तपास त्वरित करून आरोपीला अटक करणे, गुन्हा दोष सिद्धीचे प्रमाण वाढवणे आदी आदेश देण्यात आले. मात्र, आदेशानुसार महागाव पोलिसांची कृती दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आग्रही असताना, त्यांच्या आदेशाचे मात्र पोलिसांना वावडे दिसत आहे. परिणामी नागरिकांच्या नजरेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन होत आहे.
मटका, जुगार बंद करण्याऐवजी क्लब सुरू करा म्हणून शहरात एका जमादाराने मध्यस्थांमार्फत संदेश पाठवल्याची चर्चा गावभर पसरली आहे. क्लब सुरू करण्यासाठी उत्सुकांचा शोध घेतला जात आहे. तालुक्यात आधीच मटका जुगाराचे जाळे पसरलेले आहे. मटका खावाल कोण आहे, हे सर्वश्रुत असताना, त्याच्यापर्यंत पोलिसाचे हात पोहोचले नाही. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील मटका, जुगाराच्या काउंटरमध्ये कमालीची वाढ झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची सभा झाली. त्यात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी शहरात ५४ दारू विक्रेत्यांनी कसा धुमाकूळ घातला, याचा पाढा वाचला आहे. त्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अभिवचन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले. मात्र, आजपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. उलट शासकीय दारू दुकान बंद झाल्यापासून किमान रोज १०० पेटी देशी दारू विविध ठिकाणांवरून अवैध मार्गाने विकल्या जात आहे.
बॉक्स
पोलिसांवरील विश्वास चालला उडत
गेल्या सात, आठ महिन्यांपासून दाखल गुन्ह्यांमध्ये महिलांवरील अत्याचार, अनुसूचित जाती, जमाती समाजातील नागरिकांवरील अत्याचाराचे गुन्हे, पोस्ट खात्यातील बचत रकमेतून खातेदाराची झालेली फसवणूक, माहूर येथील सोन्याच्या प्रकरणात झालेली फसवणूक, शहरातील अमर सकरगे मृत्यू प्रकरणात दिशाहीन तपास पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावण्यास पुरेसा आहे. सकरगे या २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत झालेला मृत्यू स्थानिक पोलिसांनी सुरुवातीलाच आत्महत्या असल्याचा निष्कर्ष लावला होता. त्यादृष्टीने त्यांनी तपास केल्यामुळे हे संशयित प्रकरण जवळपास गुंडाळण्यात जमा आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस स्वतःचे कसब वापरत नसल्यामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास उडत आहे.