महागावच्या बिबट बछड्याचा नागपुरात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:30 PM2018-04-25T21:30:59+5:302018-04-25T21:30:59+5:30
पाण्याच्या शोधात भरकटलेल्या दुसऱ्याही बिबट बछड्याचा नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मृत्यू झाला. तर बछड्यांच्या शोधात मादी बिबटाचा तालुक्याच्या वाकान परिसरात हैदोस सुरू आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजय भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : पाण्याच्या शोधात भरकटलेल्या दुसऱ्याही बिबट बछड्याचा नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मृत्यू झाला. तर बछड्यांच्या शोधात मादी बिबटाचा तालुक्याच्या वाकान परिसरात हैदोस सुरू आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महागाव तालुक्यातील वाकान शिवारात संतोष राठोड यांच्या शेतात १३ एप्रिल रोजी मादी बिबटासह दोन नवजात बछड्यांचे दर्शन नागरिकांना झाले होते. तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने घाबरून जावून मादी बिबट्याने दोन नवजात बिबटांना सोडून पलायन केले. याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली. त्यावेळी एक नवजात बछडा मृतावस्थेत आढळून आले. तर जिवंत बछड्याला वन विभागाला ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार करण्यात आले. तीन दिवस शेतातच त्याला ठेवून मादी बिबट येण्याची प्रतीक्षा करण्यात आली. परंतु मादी बिबट आलीच नाही. त्यामुळे या बछड्याला नागपूर येथील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे या बछड्याला पाठवून उपचार सुरू झाले. तेथे सुहास असे नामकरणही करण्यात आले. परंतु त्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ.चेतन राठोड व डॉ.बिलाल यांनी निरीक्षण नोंदविले.
दरम्यान, पिलापासून विभक्त झालेली मादी बिबट चांगलीच चवताळली आहे. आपल्या पिलांच्या शोधात ती सैरभैर भटकंती करीत आहे. रात्री-बेरात्री अनेकांना तिचे दर्शन झाले. रविवारी रात्री वाकान येथील अनिल पवार यांचा गोरा ठार मारला. या मादी बिबटाच्या हैदोसाने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
वाकान शिवारात जिवंत आढळलेल्या दोन बिबटांच्या मृत्यूला वन विभागाचेच अधिकारी कारणीभूत असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमी प्रमोद भरवाडे यांनी केली आहे. वन विभागाला सकाळी माहिती दिल्यानंतरही दगडात फसलेल्या पिलावर उपचार करण्यासाठी डॉक्टर सायंकाळी पोहोचले. अधिनस्थ कर्मचाºयांनीही योग्य खबरदारी घेतली नाही. त्यामुळेच या दोन वन्यजीवांचा प्राण गेला, असा आरोप त्यांनी केला आहे.