राळेगावात महानेटच्या कामाने सिमेंट रस्त्याची लागताहे ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:55 PM2019-09-09T22:55:59+5:302019-09-09T22:56:25+5:30
गेली काही महिन्यांपासून महानेटद्वारे ७५ ते १०० फूट अंतरावर सिमेंट रोडच्या कडेने मशीनद्वारे खड्डे केले जात आहे. दोन खड्ड्यांच्या मधात मशीनद्वारे आडवे होल करून त्यातून केबल टाकली जात आहे. तीन फूट रूंद आणि तितक्याच खोलीचे खड्डे याकरिता केले जात आहे. केबल टाकल्यानंतर खड्डे काही ठिकाणी अपूर्ण बुजविण्यात आले. काही ठिकाणी सिमेंटच्या दगडाचे उंचवटे टाकण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यात हे खड्डे आणि उंचवटे वाहनचालकांना दिसू शकत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शहरात रस्त्याच्या दोनही बाजूला सिमेंट रोड खालून महानेटद्वारे केबल टाकली जात आहे. यात कोट्यवधी रुपयांच्या मार्गास कुरतडने सुरू झाले आहे. केबल टाकल्यानंतर करण्यात आलेले खड्डे व्यवस्थित भरले जात नसल्याने केव्हाही गंभीर दुर्घटना होण्याची भीती आहे.
गेली काही महिन्यांपासून महानेटद्वारे ७५ ते १०० फूट अंतरावर सिमेंट रोडच्या कडेने मशीनद्वारे खड्डे केले जात आहे. दोन खड्ड्यांच्या मधात मशीनद्वारे आडवे होल करून त्यातून केबल टाकली जात आहे. तीन फूट रूंद आणि तितक्याच खोलीचे खड्डे याकरिता केले जात आहे. केबल टाकल्यानंतर खड्डे काही ठिकाणी अपूर्ण बुजविण्यात आले. काही ठिकाणी सिमेंटच्या दगडाचे उंचवटे टाकण्यात आले आहे.
पावसाच्या पाण्यात हे खड्डे आणि उंचवटे वाहनचालकांना दिसू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग झाल्याने येथे वेगाने वाहने चालविली जातात. रस्त्याच्या कडेने वाहन चालविताना या वेगवान वाहनांचा केव्हाही अपघात होऊन अनेकांच्या जीवावर ते बेतू शकते. महानेटद्वारे प्रथम आष्टा रोड व काही ग्रामीण क्षेत्रात रस्त्या खालून केबलकरिता रस्त्याची दुर्दशा केली आहे. सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहून अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना महानेटकडून करवून घेण्याची गरज आहे. संबंधित विभागाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.