यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रुग्णांना दररोज चिंतामणीचा महाप्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:28 AM2018-11-24T10:28:40+5:302018-11-24T10:30:41+5:30
कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात भरती सर्व रुग्णांना चिंतामणी देवस्थानकडून दररोज मोफत भोजन पुरविले जाणार आहे. हा स्तुत्य उपक्रम शनिवार, २४ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात भरती सर्व रुग्णांना चिंतामणी देवस्थानकडून दररोज मोफत भोजन पुरविले जाणार आहे. हा स्तुत्य उपक्रम शनिवार, २४ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.
ग्रामीण भागातील अनेक नागरिक उपचारासाठी कळंब येथे भरती असतात. त्यांच्या भोजनाची कुठलीही व्यवस्था रुग्णालयाकडून केली जात नाही. दवाखाना शहरापासून दूर असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवन कुठे करावे, हा मोठा प्रश्न पडतो. यात त्यांची मोठी हेळसांड होते. काही रुग्णांजवळ तर भोजनासाठी पैसे नसतात. ही अडचण लक्षात घेता, चिंतामणी देवस्थानकडून सर्व रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे.
रुग्णालयाला भेट देऊन किती रुग्ण भरती आहे, याची माहिती सकाळी देवस्थानचा कर्मचारी घेईल. त्यानंतर त्यांना भोजन पुरविले जाणार आहे. चिंतामणी देवस्थानने नजीकच्या काळात अनेक स्तुत्य उपक्रम सुरु केले. भाविकांसाठी अतिशय माफक दरात शुध्द पाण्यासह सात्विक भोजनाची व्यवस्था हा उपक्रम अतिशय लोकप्रिय ठरला आहे. यासाठी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, सहसचिव राजेश भोयर यांच्यासह सर्व विश्वस्त पुढाकार घेत आहे.
स्तुत्य उपक्रम - रवी पाटील
भोजन कुठे करावे, हा रुग्णांसाठी मोठा प्रश्न होता. चिंतामणी देवस्थानने ही जबाबदारी उचलल्याने आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहो, अशी प्रतिक्रिया कळंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवी पाटील यांनी दिली.