मेहुण्याला वाचवायला गेले अन् महाराज मृत्युमुखी पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:45 AM2021-09-03T04:45:02+5:302021-09-03T04:45:02+5:30
फोटो पाापोर्ट पुसद : मनोरुग्ण मेहुण्याने विहिरीत उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी महाराजांनी विहिरीत उडी मारली. मात्र, त्यांची ही शेवटचीच ...
फोटो पाापोर्ट
पुसद : मनोरुग्ण मेहुण्याने विहिरीत उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी महाराजांनी विहिरीत उडी मारली. मात्र, त्यांची ही शेवटचीच उडी ठरून त्यांचा मृत्यू झाला.
संत रामदास बळीराम महाराज (केवटे), असे मृत महाराजांचे नाव आहे. त्यांना पोहणे येत नसतानाही त्यांनी मेहुण्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मेहुण्याला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र, रामदास महाराज विहिरीतील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पार्डी येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पार्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामदास बळीराम महाराज (केवटे), रा. पार्डी येथील चिमा देवी संस्थांमध्ये महाराज म्हणून काम करीत होते. तसेच ते पार्डी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा मेहुणा विकास साहेबराव खंदारे, रा. लोहारा (ई) हा त्यांच्याकडे बुधवारी पाहुणा म्हणून आला होता. तो मनोरुग्ण आहे. त्याने अचानक मंदिरालगतच्या खोल विहिरीत उडी घेतली. हे पाहून रामदास महाराज यांनी पोहणे येत नसतानाही विहिरीत उडी मारली. यावेळी अंधार असल्याने त्यांना काढणे अशक्य होते. त्यातच रामदास गाळात अडकल्याने वर येऊ शकले नाही. दरम्यान, आरडाओरडा झाला. गावकरी घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी रामदासच्या मेहुण्याला बाहेर काढले. नंतर गावकऱ्यांनी गळ टाकून रामदास यांना बाहेर काढले. तोपर्यंत सारे संपले होते. गुरुवारी त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
बॉक्स
सामाजिक कार्यात होते अग्रेसर
नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रामदास महाराजांवर काळाने झडप घातली. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, दोन मुले, भाऊ, बहीण असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.