महागाव येथे महाराजस्व शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 09:57 PM2018-03-11T21:57:40+5:302018-03-11T21:57:40+5:30
येथील गोविंदराव दुधे विद्यालयात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत जागतिक महिला दिनी शिबिर घेण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
महागाव (कसबा) : येथील गोविंदराव दुधे विद्यालयात सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत जागतिक महिला दिनी शिबिर घेण्यात आले.
तहसीलदार अरुण शेलार यांनी महाराजस्व शिबिराचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार तुपसुंदरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमा पापळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दारव्हा पंचायत समितीचे उपसभापती पंडित राठोड, जिल्हा परिषद सदस्य राधा थरकडे, सरपंच कांताबाई फुसांडे, पोलीस पाटील सुजाता लाड, राजेश दुधे, सुनीता शिंदे, योगिनी गावंडे, राजेश जाधव उपस्थित होते.
प्रथम पाहुण्यांनी जिजामातेच्या प्रतिमेचे पूजन केले. सीमा पापळकर यांनी महिला म्हणजेच सृष्टी असून महिलांना त्यांचा हक्क व मान मिळालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले. महिलांनी दुसºयावर अवलंबून न राहता स्वत: जागृत असावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या शिबिरात नवीन महिला मतदारांची नाव नोंदणी, विधवा व अपंग महिलांची विविध प्रकरणे, लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत महिलेचे नाव सातबारावर चढविणे, महिला सक्षमीकरण, फेरफार आदी कामे करण्यात आली.
शिबिराला परिसरातील महिला, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, मंडळ अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळ अधिकारी डोलारकर, संचालन राठोड यांनी केले. आभार तलाठी केंद्रे यांनी मानले.