यवतमाळ : मविआ की महायुती? कुणाचे पारडे ठरणार जड? महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक

By विशाल सोनटक्के | Published: October 30, 2024 09:09 AM2024-10-30T09:09:07+5:302024-10-30T09:09:55+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : यवतमाळ मतदारसंघात काॅंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांची भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांच्यासोबत लढत होत आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : MVA or Mahayuti? Whose parde will be heavy in Yavatmal?  | यवतमाळ : मविआ की महायुती? कुणाचे पारडे ठरणार जड? महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक

यवतमाळ : मविआ की महायुती? कुणाचे पारडे ठरणार जड? महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक

Maharashtra Assembly Election 2024 :  यवतमाळ : महाविकास आघाडीने मैदानात तगडे उमेदवार उतरविल्याने महायुतीसमोर यंदा कडवे आव्हान उभे राहिले आहे. लोकसभेवेळी प्रचारात असलेले महागाई, बेरोजगारी, शेती प्रश्नाचे मुद्दे याही वेळी कायम आहेत. त्यावरून महाविकास आघाडी आक्रमक आहे. तर महायुतीची मदार निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनांवर आहे. 

यवतमाळ मतदारसंघात काॅंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांची भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांच्यासोबत लढत होत आहे. मागील निवडणुकीत मांगूळकर यांनी येरावार यांना कडवी झुंज दिली होती.  यावेळी मविआची ताकद पाठीशी असल्याने मांगूळकर यांचे पारडे जड आहे. राळेगाव मतदारसंघात पुन्हा दोन प्राध्यापकांत लढत रंगली आहे. भाजपचे प्रा. अशोक उईके यांच्या विरोधात काॅंग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके लढत देत आहेत. तर दिग्रस मतदारसंघात २० वर्षानंतर पुन्हा  शिंदेसेनेचे मंत्री संजय राठोड व काॅंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आमने-सामने आले आहेत. 

वणीमध्ये भाजपने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर विश्वास दाखवित तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मविआतर्फे उद्धवसेनेचे संजय देरकर यांच्याशी त्यांचा सामना होईल. तर पुसदमध्ये अजित पवार गटाच्या वतीने इंद्रनील नाईक दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे शरद मैंद यांना उमेदवारी मिळाली आहे. ययाती नाईक यांनीही अपक्ष अर्ज दाखल केल्याने येथील घडामोडींकडे  लक्ष लागले आहे.

काॅंग्रेसने आर्णीमध्ये जितेंद्र मोघे तर उमरखेडमध्ये साहेबराव कांबळे यांच्या रुपाने नवा चेहरा मैदानात उतरविला आहे. महायुतीच्या वतीने भाजपने आर्णीचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे आणि उमरखेडचे आमदार नामदेव ससाने यांचा पत्ता कट केला आहे.  आर्णीतून माजी आमदार राजू तोडसाम तर उमरखेडमधून किसनराव वानखेडे भाजपकडून मैदानात उतरले आहेत. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर असणार आहे. 
ऐन निवडणुकीत सोयाबीन आणि कापसाचे भाव गडगडले आहेत. हा मुद्दा सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचा ठरू शकतो. 
जागावाटपावरून रस्सीखेच होती. घटक पक्षांची समजूत घालून त्यांना कामाला लावण्याचे आव्हान असेल.   
अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी रोखण्यासाठीही प्रमुख पक्षांना कसरत करावी लागेल.  
जिल्ह्यात अनेक विकासकामे अर्धवट अवस्थेत आहेत. 

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
मतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार     पक्ष    मिळालेली मते
वणी    ७२.११%    संजीवरेड्डी बोदकुरवार    भाजप    ६७,७१०
राळेगाव    ६९.७९%    प्रा. अशोक उईके    भाजप    ९०,८२३
यवतमाळ    ५४.१२%    मदन येरावार    भाजप    ८०,४२५
दिग्रस    ६४.५५%    संजय राठोड      शिवसेना (शिंदे)    १,३६,८२४
आर्णी    ६९.३९%    संदीप धुर्वे    भाजप    ८१,५९९
पुसद    ६१.३१%    इंद्रनील नाईक    राष्ट्रवादी (अजित पवार)    ८९,१४३
उमरखेड    ६९.१६%    नामदेव ससाने    भाजप    ८७,३३७

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : MVA or Mahayuti? Whose parde will be heavy in Yavatmal? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.