Maharashtra Election 2019 : यवतमाळात सरासरी ५६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:00 AM2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:34+5:30
सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४९.५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५६ टक्के मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही भागातील मतदानाची टक्केवारीही ७० टक्क्यांपुढे गेल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभेत भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४९.५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५६ टक्के मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही भागातील मतदानाची टक्केवारीही ७० टक्क्यांपुढे गेल्याचे सांगितले जाते.
या विधानसभा मतदारसंघात दारव्हा तालुक्यातील लाडखेड व बोरीअरब या दोन जिल्हा परिषद सर्कलचा समावेश आहे. सर्वात शेवटचे गाव वडगाव(आंध) असून घाटंजी तालुक्यापर्यंत हा मतदारसंघ विस्तारला आहे. येथील मतदारसंख्या तीन लाख ८४ हजार ७७२ इतकी असून यामध्ये ६० टक्के शहरी मतदार आहेत. हा मतदारच मतदान केंद्रावर आपल्या सोयीने पोहोचल्याने दुपारपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारी कमीच होती. ग्रामीण भागात मात्र मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. साधारणत: ४ वाजतापासून मतदानाची गती वाढली. महागाव कसबा येथील मतदान केंद्रावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. यामुळेच विधानसभा क्षेत्रात एकूण मतदान किती टक्के हा आकडा वृत्त लिहिपर्यंत मिळू शकला नाही. झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून अंतिम सरासरी ५६ टक्के राहणार असल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद क्षेत्रात सखी मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागतही करण्यात आले. सर्वच ठिकाणी पिण्याचे पाणी, व्हील चेअरची व्यवस्था ठेवण्यात आली होती. यवतमाळ विधानसभेत इव्हीएम बंद पडल्याच्या दोन तक्रारी आल्या. मात्र काही मिनिटातच तेथील मतदान सुरळीत करण्यात आले. एकंदरच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.