Maharashtra Election 2019 ; बाळासाहेब मांगुळकर सर्वसामान्य लोकांचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जे लोक तळागाळातून येतात, तेच राज्य कारभार सुंदर चालवितात, हा आजवरचा अनुभव आहे. बाळासाहेब ...

Maharashtra Election 2019; Balasaheb Mangulkar candidate of the general public | Maharashtra Election 2019 ; बाळासाहेब मांगुळकर सर्वसामान्य लोकांचे उमेदवार

Maharashtra Election 2019 ; बाळासाहेब मांगुळकर सर्वसामान्य लोकांचे उमेदवार

googlenewsNext
ठळक मुद्देविजय दर्डा : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा कार्यकर्ता मेळावा, यवतमाळात रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन व नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जे लोक तळागाळातून येतात, तेच राज्य कारभार सुंदर चालवितात, हा आजवरचा अनुभव आहे. बाळासाहेब मांगूळकर हे कोणत्या एका पक्षाचे उमेदवार नसून ते सर्वसामान्य लोकांचे उमेदवार आहेत. ते या मातीशी समरस झाले आहेत. त्यांना निवडून आणूनच आपण दिवाळी साजरी करूया, असे भावनिक आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
येथील टिंबर भवनात गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी विजय दर्डा मार्गदर्शन करीत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगूळकर यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. विजय दर्डा पुढे म्हणाले, यवतमाळ मतदारसंघातील लोकांना अनेक वर्षानंतर त्यांच्या मनातला उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातील प्रत्येक मनुष्य स्वत:च उमेदवारच आहे. लोकांना आपले प्रश्न सोडविणारा आमदार हवा आहे. आपल्या जीवनात सुबत्ता कोणता आमदार आणून शकेल, हे लोकांवरच अवलंबून आहे.
विकासाच्या नावावर शहर भकास करण्यात आले आहे. रस्त्यावर खड्डे वाढले, त्यामुळे अपघात होत आहे. प्रदूषण वाढले आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलेले खड्डे बाळासाहेब मांगूळकरच बुजवू शकतील. यवतमाळ शहरात गुन्हेगारी वाढली असून त्या गुन्हेगारीला राजकीय आश्रय मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात यवतमाळात कोणताही नवीन उद्योग आला नाही. जे उद्योग येथे आधीपासूनच होते, ते या राज्यकर्त्यांच्या ‘उद्योगां’मुळे बंद पडत आहेत. त्यातून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच्या सरकारने प्रयत्न करून यवतमाळात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणले. पण आज त्याची काय अवस्था आहे? तेथे तज्ज्ञ डॉक्टर नाही. कोट्यवधीच्या मशिनरी बंद आहे. सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा मिळत नाही. भाजप सरकारने ग्रामीण महिलांसाठी आणलेल्या योजना केवळ कागदावर आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या विवंचना कायम असून आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सर्व समस्यांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे बाळासाहेब मांगूळकर. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने काम करावे, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले.
या कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार विजयाताई धोटे, डॉ. टी.सी.राठोड, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या संध्याताई सव्वालाखे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष जी.बी. खडसे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र गणवीर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अरूण राऊत यांनी केले.
गुन्हेगारी मोडीत काढू - मांगुळकर
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बाळासाहेब मांगूळकर यांनी यवतमाळकर जनतेच्या विविध प्रश्नांना हात घातला. शहरातील पाणी, रस्ते, नाल्या या समस्या सोडविण्यासाठी मी प्राधान्याने काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. मला एकदा संधी द्या, शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न मी सोडवून दाखवितो, अशी ग्वाही मांगूळकर यांनी देताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर केला.
कार्यकर्ते म्हणाले, चार नव्हे आठ दिवसाआड पाणी
यवतमाळमध्ये सध्या बेंबळावरून पाणी आणण्याची अमृत योजना अपूर्ण आहे. ३०२ कोटींच्या योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण दूर करण्यासाठी बाळासाहेब मांगूळकरच आमदार हवेत. चापडोह, निळोणा हे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. तरी यवतमाळ शहराला चार दिवसाआड पाणी दिले जात आहे, असा उल्लेख विजय दर्डा यांनी करताच उपस्थित लोकांनी ‘चार नव्हे आठ दिवसाआड पाणी दिले जात आहे’ असा कोलाहल केला. त्यातूनच पाणी प्रश्नावर लोकांमध्ये खदखद कायम असल्याचे दिसले.
काँग्रेसच्या रॅलीचे चौकाचौकात स्वागत
काँग्रेस-राष्ट्रवादी, पीरिपा, रिपाइं (गवई गट), स्वाभिमानी संघटना व मित्र पक्षांचा टिंबर भवनात कार्यकर्ता मेळावा झाला. त्यानंतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची रॅली निघाली. बाळासाहेब मांगुळकर यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी माजी खासदार विजय दर्डा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार कीर्ती गांधी, किशोर दर्डा, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, राहुल ठाकरे, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव संध्याताई सव्वालाखे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष वनमाला राठोड आदींसह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. ही रॅली स्टेट बँक चौक, अप्सरा टॉकीज, हनुमान आखाडा, पाच कंदील चौक मार्गे तहसील कार्यालयात पोहोचली. मार्गात आतषबाजी करीत उत्स्फूर्तपणे स्वागत झाले.

Web Title: Maharashtra Election 2019; Balasaheb Mangulkar candidate of the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.