Maharashtra Election 2019 ; भाजपने विधानसभेच्या पाचही जागा राखल्या, सेनेची विधानसभेत चौथ्यांदा एन्ट्री, तीन नवे चेहरे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:21+5:30

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष यवतमाळच्या लढतीकडे लागले होते. अखेरच्या फेरीपर्यंत या मतदारसंघात चुरस राहिली. भाजपचे मदन येरावार येथे विजयी झाले. त्यांना काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी जोरदार लढत दिली. येरावारांच्या विजयाची अधिकृत घोषणा व मतांची आघाडी वृत्तलिहिस्तोवर झालेली नव्हती. या मतदारसंघात शिवसेना बंडखोर संतोष ढवळे ३६ हजारांपर्यंत धडक देत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Maharashtra Election 2019 ; BJP retains all five seats in Legislative Assembly, winning fourth entry in Sena Assembly, three new faces | Maharashtra Election 2019 ; भाजपने विधानसभेच्या पाचही जागा राखल्या, सेनेची विधानसभेत चौथ्यांदा एन्ट्री, तीन नवे चेहरे विजयी

Maharashtra Election 2019 ; भाजपने विधानसभेच्या पाचही जागा राखल्या, सेनेची विधानसभेत चौथ्यांदा एन्ट्री, तीन नवे चेहरे विजयी

Next
ठळक मुद्देभाजपच्या जिल्हाध्यक्षांनी उमरखेडचा गड राखलायेरावार, उईके, राठोड हे तिन्ही मंत्री पुन्हा विधिमंडळ सभागृहातआर्णी, उमरखेडमध्ये चेहरा बदलाचा भाजपला फायदासेना, भाजप, राष्ट्रवादीच्या बंडखोरांना मतदारांनी नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांबाबत २०१४ प्रमाणेच २०१९ लाही स्थिती कायम राहिली. भाजपने आपला गड राखत पाचही जागा पुन्हा निवडून आणल्या. शिवसेना व राष्ट्रवादीनेही आपला बालेकिल्ला सांभाळत विजयश्री खेचून आणली.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष यवतमाळच्या लढतीकडे लागले होते. अखेरच्या फेरीपर्यंत या मतदारसंघात चुरस राहिली. भाजपचे मदन येरावार येथे विजयी झाले. त्यांना काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांनी जोरदार लढत दिली. येरावारांच्या विजयाची अधिकृत घोषणा व मतांची आघाडी वृत्तलिहिस्तोवर झालेली नव्हती. या मतदारसंघात शिवसेना बंडखोर संतोष ढवळे ३६ हजारांपर्यंत धडक देत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड चौथ्यांदा निवडून आले. त्यांनी सर्वाधिक ६३ हजार मतांची आघाडी मिळविली आहे. त्यांनी भाजप बंडखोर संजय देशमुख यांचा पराभव केला. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे तारिक लोखंडवाला यांना अवघी सहा हजार मते मिळाली. उमरखेड मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे तिकीट कापून नगराध्यक्ष नामदेव ससाने यांना रिंगणात उतरविले होते. ससाने हे नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांचे उमेदवार मानले जात होते. अखेर भुतडा यांनी ससाने यांना निवडून आणत आपला उमरखेडचा गड कायम राखला. येथे सेना बंडखोर डॉ. विश्वनाथ विणकरे यांना मतदारांची अपेक्षित साथ लाभली नाही. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक यांनी आपले सख्खे चुलत भाऊ अ‍ॅड. नीलय नाईक यांचा पराभव केला. मात्र निलय नाईक यांनी राष्ट्रवादीला अनपेक्षितरीत्या टक्कर दिली. ही लढत एकतर्फी होईल असे मानले जात होते. मात्र निलय यांनी मतदारांचा हा अंदाज खोटा ठरविला.
राळेगाव मतदारसंघात प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी पुन्हा विजय मिळवित भाजपची जागा कायम राखली. त्यांनी काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांचा पराभव केला. मात्र उईकेंना मतांची मोठी आघाडी मिळविता आली नाही. ते पाहता काँग्रेसने तेथे आव्हान दिल्याचे स्पष्ट होते. आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. तेथे भाजपचे डॉ. संदीप धुर्वे विजयी झाले. धुर्वे यांचा विजय हा मालकाचा विजय असल्याचे मानले जाते. तेथे भाजप बंडखोर राजू तोडसाम तेवढे यशस्वी ठरले नाही. वणीमध्ये भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी गड राखला. काँग्रेसचे वामनराव कासावार तेथे पराभूत झाले. शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष तेथे तेवढे प्रभावी ठरले नसल्याचे दिसते.

काँग्रेसचा पाचही मतदारसंघात संघर्ष
गेली पाच वर्ष काँग्रेसमध्ये प्रचंड सामसूम आणि भाजपमध्ये तेवढीच वर्दळ असल्याने २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार भाजपच्या ‘संपन्न’ उमेदवारांपुढे टिकाव धरतील की नाही, अशी साशंकता होती.
प्रत्यक्षात काँग्रेसच्या पाचही उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली. बहुतांश ठिकाणी काँग्रेसच्या माजी आमदारांचा अवघ्या थोड्याशा फरकाने पराभव झाला. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या नसतानाही काँग्रेसने मतांमध्ये प्रचंड झेप घेतली.

यवतमाळ मतदारसंघात सर्वाधिक चुरस
विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार व काँग्रेसचे अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंत चुरस होती. पोस्टल बॅलेटपासून मांगूळकर यांनी मतांमध्ये आघाडी घेतली होती.
मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्या झाल्या. २६ व्या फेरीपर्यंत मांगुळकर सुमारे आठ हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये येरावार यांनी जोरदार मुसंडी मारत काँग्रेसची मतांची आघाडी भरुन काढली आणि २९ व्या फेरीअखेर १३०० मतांची आघाडी घेत विजय साकार केला.

सर्वच बंडखोरांना अपयश, मात्र लढत दिली
या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी बंडखोरांना सपशेल नाकारले. अनेक ठिकाणी या बंडखोरांमुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीतही आले होते. मात्र पक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्यावर मात केली.
माझी ५२ हजार मते फिक्स, १२०० मतांचीच अ‍ॅडजेस्टमेंट हवी, असे सांगून रिंगणात उतरलेल्या शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांना मतदारांनी ३५ हजारावर रोखले. दिग्रसमध्ये भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी मात्र शिवसेनेच्या तोंडाला चांगलाच फेस आणला. त्यांना ७३ हजार २१७ मते मिळाली.

या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?
पुसदमध्ये बंगल्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अ‍ॅड. नीलय नाईक यांना मतदारांनी उत्स्फूर्त साथ दिली, त्यांनी सख्खा चुलत भाऊ इंद्रनील नाईक यांना जोरदार टक्कर दिली.
भाजपचे मंत्री मदन येरावार यांच्यापुढे काँग्रेसचे नवखे उमेदवार अनिल मांगुळकर यांनी अखेरच्या फेरीपर्यंत मोठे आव्हान उभे केले होते.
अनेक मतदारसंघात ईव्हीएमबाबत आक्षेप व तक्रारी पहायला मिळाल्या.

विजयाचा जल्लोष
उमेदवाराला मतांची आघाडी मिळताच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्र परिसरात गुलाल उधळून जल्लोष केला. मात्र अनेकांचा हा उत्साह पराभवामुळे औटघटकेचा ठरला.

Web Title: Maharashtra Election 2019 ; BJP retains all five seats in Legislative Assembly, winning fourth entry in Sena Assembly, three new faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.