महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:48 PM2019-10-21T15:48:53+5:302019-10-21T16:02:58+5:30
उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील मतदारांनी सोमवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
महागाव (यवतमाळ) - उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील मतदारांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे तेथील मतदान केंद्रात शुकशुकाट आहे. धारकान्हा ग्रामस्थांनी गेल्या लोकसभा निवडणुकीतही मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. धड रस्ते नाही. त्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे तेथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकून रोष व्यक्त केला.
गावात मतदानासाठी बुथ क्र. 36 निर्माण करण्यात आले होते. त्यावर 227 मतदार होते. मात्र एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही, अशी माहिती मतदान अधिकारी रमेश तिजारे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. दरम्यान, मतदारांनी बहिष्कार टाकल्याची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत ठमके, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता विनोद चव्हाण यांना धारकान्हा येथे रवाना केले. मात्र त्यांच्या विनंतीलाही मतदारांनी टोलवून लावले. लोकसभा निवडणुकीतसुद्धा तेथील मतदारांनी बहिष्कार टाकला होता, अशी माहिती तहसीलदार निलेश मडके यांनी दिली.
मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 टक्के मतदान. https://t.co/ADLyGwiPFZ
— Lokmat (@MiLOKMAT) October 21, 2019
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या 13व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मत प्रक्रियेमध्ये सुमारे 9 कोटी मतदार 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. राज्यात एकूण 8,98,39,600 मतदार असून यामध्ये 4,68,75,750 पुरुष, 4,28,43,635 महिला, 3,96,000 दिव्यांग, 1,17,581 सर्व्हिस मतदार आणि 2,634- तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आयोगाने केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाची मदत घेतली असून, राज्य पोलीस दलातील सुमारे 40 हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.