Maharashtra Election 2019 ; यवतमाळात हायटेक प्रचारतंत्राचा भडीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:04+5:30
अवघ्या १२०० मतांनी शिवसेनेच्या चिन्हावर पराभव पत्करलेले संतोष ढवळे यांनी आता शिवसेना बंडखोर म्हणून दावेदारी केली आहे. आपल्या सामाजिक कार्याचे दाखले देत ते प्रचार मोहीम राबवित आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांनीही मतदारांना भावनिक आवाहन केले आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मुख्यालयाचा विधानसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात यावा, यासाठी सत्ताधारी व विरोधक सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. मतदारसंघातील तीन लाख ८४ हजार ७७३ मतदारांपैकी ६० टक्के मतदार हा यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात राहणारा आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक तंत्राचा वापर केला जात आहे. प्रत्येकच उमेदवाराने आपले वॉर रूम उघडले असून प्रतिस्पर्ध्याला ट्रोल केले जात आहे.
या मतदारसंघात सातत्याने फेरबदल होत आला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार व पालकमंत्री मदन येरावार यांनी वर्चस्व कायम ठेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. आपली भूमिका विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले. काँग्रेसचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचेही शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व राहिले आहे. आता हा भाग नगरपरिषद क्षेत्रात आल्याने विधानसभा पुन्हा काँग्रेसकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यात हायटेक प्रचार तंत्राचा वापर केला जात आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाकडून पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रात उडी घेतलेले बिपीन चौधरी यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच जाहीर प्रचाराला सुरुवात केली. त्यांचीही नेटकरी फौज विविध मुद्दे, समस्या सोशल मीडियावर ट्रोल करीत आहे.
अवघ्या १२०० मतांनी शिवसेनेच्या चिन्हावर पराभव पत्करलेले संतोष ढवळे यांनी आता शिवसेना बंडखोर म्हणून दावेदारी केली आहे. आपल्या सामाजिक कार्याचे दाखले देत ते प्रचार मोहीम राबवित आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांनीही मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. विदर्भ राज्य आघाडीचे अॅड. अमोल बोरखडे, बसपाकडून संदीप देवकते हे उमेदवारही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
८० चौरस किलोमीटर परिघावर फोकस
यवतमाळ शहराच्या नगरपरिषद विस्तारानंतर येथील लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्र वाढले आहे. त्यामुळेच यवतमाळातील समस्या, विकास कामे या भोवतीच येथील निवडणूक व प्रचार यंत्रणा केंद्रीत झाली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत सर्वच उमेदवारांकडून यवतमाळातील समस्या, येथील प्रस्तावित कामे यावरच उहापोह केला जात आहे. हेच मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून सचित्र व्हायरल होत आहे. सध्या तरी व्हॉटस्अॅप, इन्ट्राग्राम, फेसबुक यावरील ग्रुपमध्ये उमेदवाराला ट्रोल करून चर्चांचे फड रंगत आहे.