Maharashtra Election 2019 ; सातही मतदारसंघात प्रचार तोफा थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:05+5:30
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात काट्याच्या लढती होत आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर सामान्य उमेदवार म्हणून मतदारांपुढे जात आहे. भाजपचे वजनदार मंत्री मदन येरावार यांच्याशी त्यांची फाईट आहे. या दोघांपुढेही शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांचे आव्हान आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात विधानसभेच्या सातही मतदारसंघात शनिवार १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतरचे २४ तास छुपा प्रचार करण्याची मुभा राहणार आहे. शनिवार हा जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने बहुतांश उमेदवारांचा रॅलीच्या माध्यमातून मतदारांसमोर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न राहील.
जिल्ह्यात २१ आॅक्टोबर रोजी विधानसभेचे सात आमदार निवडून देण्यासाठी मतदान होणार आहे. २१ लाख ७० हजार मतदार या आमदारांचा फैसला करणार आहे. या निवडणुकीसाठी गेली दोन आठवडे सुरू असलेला जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळी थांबणार आहे. विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या सभांचाही शनिवार अखेरचा दिवस आहे. यवतमाळात स्टार प्रचारक स्मृती इराणी यांचा रोड शो होऊ घातला आहे. काही उमेदवारांनी रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत मिळणाऱ्या प्रतिसादावर त्या उमेदवाराच्या एकूणच स्थितीचा अंदाज बांधला जाणार आहे. जाहीर प्रचार तोफा थंडावल्यानंतर निवडणूक विभाग व प्रशासनाकडून उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आणखी बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. प्रमुख मार्गांवरील तपासणी आणखी कडक होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस कुमक तैनात केली जाणार आहे. गुप्तचर विभागाच्या यंत्रणेचा राजकीय पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांवर छुप्या पद्धतीने वॉच राहणार आहे. शनिवार व रविवार रात्र ही राजकीय दृष्ट्या ‘कत्ल की रात’ राहणार आहे. त्यामुळे मागास वस्त्यांमध्ये पैसे वाटण्यासारखे प्रकार उमेदवारांच्या राजकीय कार्यकर्त्यांकडून होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय हॉटेल, ढाब्यांवरील पार्ट्या, दारूचा महापूर या सारखे प्रकारही घडण्याची शक्यता अधिक आहे. त्यावर जिल्हा प्रशासन नेमके कशापद्धतीने नियंत्रण ठेवते याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत. सद्यस्थितीत यवतमाळ शहर पोलीस ठाण्याची हद्द वगळता इतरत्र रात्री १२ नंतर प्रशासनाकडून कुठेही कठोर तपासणी, गस्त व वॉच होताना दिसत नाही. त्याचा फायदा काही उमेदवार उचलताना दिसत आहे. निवडणूक असल्याने अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. हॉटेल-ढाब्यांवरील गर्दीही उत्तररात्री नंतर कायम असल्याचे पहायला मिळते. ते पाहता निवडणूक विभाग व स्थानिक प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावात तर नाही ना अशी शंका मतदारांमध्ये व्यक्त होताना दिसते. पैसा, दारू वाटप या सारखे प्रकार जाहीर प्रचार थंडावल्यानंतर अखेरच्या ४८ तासात केले जातात. प्रशासन किमान त्यावर तरी कठोर वॉच ठेवणार का याकडे नजरा लागल्या आहेत.
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात काट्याच्या लढती होत आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर सामान्य उमेदवार म्हणून मतदारांपुढे जात आहे. भाजपचे वजनदार मंत्री मदन येरावार यांच्याशी त्यांची फाईट आहे. या दोघांपुढेही शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांचे आव्हान आहे. प्रहारचे बिपीन चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर, विदर्भ राज्याचा झेंडा घेऊन अॅड. अमोल बोरखडेसह १३ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. काँग्रेसच्या मांगुळकर यांना भाजप टक्कर देते की सेना बंडखोर याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विजय खडसे यांची लढत शिवसेना बंडखोर डॉ. विश्वनाथ विणकरे व भाजपचे नामदेव ससाने यांच्याशी होत आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडी, मनसे हे उमेदवारसुद्धा मतांमध्ये विभाजन करणारे आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे इंद्रनील मनोहरराव नाईक आणि भाजपचे आमदार अॅड. नीलय नाईक यांच्यात थेट सामना होतो आहे. तेथे वंचित बहुजन आघाडी, मनसे किती मजल मारते हे पाहणे महत्वाचे ठरते.
दिग्रस विधानसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया या मतदारसंघात संजय राठोड यांच्यापुढे भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच ही लढत काट्याची होईल असे मानले जाते. भाजप बंडखोराला शिवसेनेतील दुसºया गटाची भक्कम साथ असल्याचेही बोलले जाते. या मतदारसंघात जातीय समीकरण अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीचे मो.तारिक मो. शमी लोखंडवाला हे रिंगणात आहे. त्यांनीही अल्पसंख्यकांसह आघाडीच्या हक्कांच्या मतदारांमध्ये प्रभाव राखला आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अॅड. शिवाजीराव मोघे, भाजप बंडखोर आमदार राजू तोडसाम, भाजपचे डॉ. संदीप धुर्वे हे प्रमुख उमेदवार आहेत. अॅड. मोघेंचा सामना तोडसाम यांच्याशी होतो की धुर्वेंशी याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तीनही आमदारांचे काम मतदारांनी अनुभवल्याने यावेळी ते नेमके कुणाला पुन्हा संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरते.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राचार्य डॉ. अशोक उईके, काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांच्यात थेट लढत आहे. भाजपच्या मतांमध्ये फारसे विभाजन नाही तर दुसरीकडे काँग्रेसचीही स्थिती सुधारत असल्याचे सांगितले जाते.
वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना बंडखोर व अपक्षांचा बोलबाला आहे. काँग्रेसचे वामनराव कासावार आणि भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यात सामना होतो आहे. सेना बंडखोर विश्वास नांदेकर, सुनील कातकडे, राष्टÑवादीचे बंडखोर डॉ. महेंद्र लोढा, मनसेचे राजू उंबरकर आणि अपक्ष संजय देरकर या सर्वांनी पक्षाच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहे. त्यात त्यांना कितपत यश येते हे वेळच सांगेल.
शिवसेनेत गटबाजी उफाळली, बंडखोर कुणालाच जुमानेना
एरव्ही काँग्रेसमधील गटबाजीची मुंबई-दिल्लीपर्यंत चर्चा होते. परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसमधील ही गटबाजी शमल्याचे चित्र आहे. मात्र युतीमध्ये आणि त्यातही शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आल्याचे दिसते. तीन मतदारसंघात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाºयांनीच बंडखोरी केली असून ते आता जिल्ह्यातील सेना नेतेच नव्हे तर ‘मातोश्री’लाही जुमानत नसल्याचे चित्र पहायला मिळते. दोन दिवसांपूर्वी मुंबईतून काही बंडखोरांचे निलंबन झाल्याची यादी सोशल मीडियावर फिरली. मात्र ही यादी अधिकृत नसून आमच्या निलंबनाचा आदेश दाखवा असे खुले आव्हान या बंडखोरांनी दिले आहे. जिल्हा शिवसेनेत निवडणुकीत उफाळलेली ही बंडखोरी बघता नेत्यांमध्ये अद्यापही ‘समेट’ झाला नसल्याचे स्पष्ट होते. या बंडखोरांना जिल्हा शिवसेनेतील दुसºया गटाचे पाठबळ तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. सेनेतील दुसºया गटाच्या या नेत्यांनी अलिप्ततेचे धोरण अवलंबिले असून आपल्या सोईच्या ठिकाणीच प्रचाराच्या निमित्ताने हे नेते जनतेला दर्शन देत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी पाहता जिल्हा शिवसेनेतील एकजुटीला नेत्यांच्या गटबाजीने मोठा सुरुंग लागल्याचे दिसून येते.