Maharashtra Election 2019 : सात मतदारसंघात ८७ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:09+5:30

आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न केले गेले. गोंड समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावे हा या मागचा काँग्रेसचा हेतू आहे.

Maharashtra Election 2019 : Six candidates in 87 constituencies | Maharashtra Election 2019 : सात मतदारसंघात ८७ उमेदवार रिंगणात

Maharashtra Election 2019 : सात मतदारसंघात ८७ उमेदवार रिंगणात

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : ३९ उमेदवारांची माघार, सर्वाधिक उमरखेडच्या १४ उमेदवारांनी मैदान सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी नामांकन मागे घेण्याच्या दिवशी जिल्हाभरात एकूण ३९ उमेदवारांनी मैदान सोडले. कुणी श्रेष्ठींच्या आदेशाचा सन्मान केला तर कुणाला भविष्यातील तडजोडींचे आश्वासन दिले गेले.
जिल्ह्यातील विधानसभेच्या सात मतदारसंघासाठी सव्वाशेवर उमेदवारांचे नामांकन छाननी अंती कायम राहिले होते. यातील अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांना अडचणीचे वाटणारे हे उमेदवार विरोधी पक्षांना मात्र सोईचे होते. म्हणून त्यांनी या उमेदवारांना रिंगणात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले तर काही उमेदवार हातचे निघून गेले. सर्वाधिक १४ उमेदवारांनी उमरखेड मतदारसंघातून माघार घेतली आहे. तर सर्वात कमी एक उमेदवार वणीमध्ये मैदानातून बाहेर पडला. आजच्या घडीला सर्वाधिक १९ उमेदवार वणी मतदारसंघात रिंगणात असून सर्वात कमी प्रत्येकी १० उमेदवार उमरखेड व दिग्रस मतदारसंघात कायम आहे. वणी मतदारसंघात पंचरंगी सामना होण्याची चिन्हे आहे. राळेगाव, पुसदमध्ये दुहेरी तर उमरखेड, आर्णी, यवतमाळ व दिग्रस मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची स्थिती दिसू लागली आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न केले गेले. गोंड समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावे हा या मागचा काँग्रेसचा हेतू आहे. अखेर हा हेतू साध्य करण्यात व तोडसाम यांना रिंगणात कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले आहे. तेथे काँग्रेसची लढत भाजप बंडखोरांशी तर होणार नाही ना अशी शंकाही राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या घाटंजी येथील नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर, आर्णी येथील अमोल मंगाम यांनीही नामांकन दाखल केले होते. मात्र सोमवारी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक गजानन इंगोले तर दिग्रस मतदारसंघात भाजपचे अजय दुबे यांनी रिंगणातून माघार घेतली. उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राजेंद्र नजरधने, भाविक भगत यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा सन्मान राखत मैदान सोडले. अडचणीचे ठरणाºया अनेक उमेदवारांचे वेळेपर्यंत नामांकन मागे घेण्यात सत्ताधाºयांना यश आले नसले तरी अजूनही त्यांनी पाठपुरावा सोडलेला नाही. अनेक ठिकाणी उमेदवार बसवून त्याचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न अखेरपर्यंत होणार आहे.
विधानसभेच्या या निवडणुकीत मंत्री भाजपचे प्राचार्य डॉ. अशोक उईके, मदन येरावार, शिवसेनेचे संजय राठोड या तिघांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. राठोड हे आपले एक लाखांवर मतांच्या आघाडीचे उद्दीष्ट गाठू शकतात की त्यांची आघाडी कमी होते हे पाहणे महत्वाचे आहे. २०१४ ला जिंकलेल्या पाचही जागा भाजप २०१९ च्या निवडणुकीत कायम ठेऊ शकते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. पुसद विधानसभा मतदारसंघाची लढत लक्षवेधी ठरणार आहे. कारण तेथील निवडणूक भाऊबंदकीत लढली जात आहे. भाजपकडून आमदार नीलय नाईक तर राष्टÑवादीकडून विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील यांना रिंगणात उतरविले गेले आहे. या मतदारसंघात बहुसंख्य असलेले बंजारा समाज बांधव नव्या चेहºयाला संधी देतात की नीलय नाईकांना वरच्या सभागृहातून खालच्या सभागृहात पाठवितात हे पाहणे महत्वाचे ठरते.

मतदारसंघनिहाय रिंगणातील उमेदवार
वणी : १९, उमरखेड : १०, पुसद : ११, यवतमाळ : १३, दिग्रस : १०, राळेगाव : १३, आर्णी : ११
- एकूण उमेदवार ८७

मतदारसंघनिहाय ‘विड्रॉल’ उमेदवार
वणी : ०१, उमरखेड : १४, पुसद : ०८, यवतमाळ : ०२, दिग्रस : ०५, राळेगाव : ०५, आर्णी : ०४
- एकूण उमेदवार ३९

ढवळेंना अंगठी तर देशमुखांना कपबशी
निवडणुकीच्या रिंगणात बंडखोर म्हणून दंड थोपटलेल्या उमेदवारांना नेमके कोणते निवडणूक चिन्ह मिळाले याची उत्सुकता मतदारांमध्ये कायम आहे. यवतमाळ मतदारसंघात शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांना अंगठी तर उमरखेडचे सेना बंडखोर डॉ. विश्वनाथ विणकरे यांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे. दिग्रस मतदारसंघातील भाजप बंडखोर संजय देशमुख यांना कपबशी, आर्णीतील भाजप बंडखोर राजू तोडसाम यांना पेटी तर वणीतील शिवसेना बंडखोर विश्वास नांदेकर यांना हेलिकॉप्टर, सुनील कातकडे यांना बकेट चिन्ह मिळाले आहे. ही चिन्हे शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे या अपक्ष बंडखोरांपुढे आव्हान आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Six candidates in 87 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.