Maharashtra Election 2019 : वणी मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:01 AM2019-10-22T05:01:00+5:302019-10-22T05:05:01+5:30
विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येकच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदार शिस्तीत मतदान करतानाचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पहावयास मिळाले. सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर राजूर व घोन्सा अशा दोन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी विधानसभा मतदार संघात सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६८ टक्के मतदान झाले. यादरम्यान, अनेक ठिकाणी यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया रखडली. मात्र काही ठिकाणी यंत्रांमध्ये दुरूस्ती करून, तर काही ठिकाणी नवीन यंत्र लावून मतदान घेण्यात आले. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोमवारी सकाळपासून या भागात ढगाळ वातावरण होते. हलक्या स्वरूपाचा पाऊसही सुरू झाला. मात्र १० वाजतानंतर ढगाळ वातावरण निवळले. सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला धिम्यागतीने मतदान झाले. दुपारी १२ वाजतानंतर मतदार हळूहळू मतदानासाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. वणी विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२७ टक्के, ११ वाजेपर्यंत १९.३६ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३४.९२ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.८३ टक्के, तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.७५ टक्के मतदान झाले. यात एक लाख ७२ हजार ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येकच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदार शिस्तीत मतदान करतानाचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पहावयास मिळाले. सकाळी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर राजूर व घोन्सा अशा दोन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला. मात्र यंत्रातील दोष दूर करून पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. यासोबतच वणी शहरातील मोमिनपुरा भागातील ११५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दोनवेळा मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे बराचवेळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती.
वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील ५५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात अचानक बिघाड झाला. सुरूवातीला यंत्रातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात यश न आल्याने नवे मतदान यंत्र तेथे लावण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजून ३२ मिनीटांनी पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. जवळपास दीड तास मतदारांना मतदान यंत्राची प्रतीक्षा करत मतदान केंद्रावरच थांबावे लागले.
वणी शहरातील रजनी मंगेश लुथडे ही महिला तीन दिवसांपूर्वी वणीतील एका खासगी रूग्णालयात प्रसूत झाली. मात्र ती आपल्या चिमुरड्या बाळाला घेऊन यात्रा मैदान परिसरातील मतदान केंद्रावर रूग्णवाहिकेद्वारे पोहोचली व तिने मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान याच मतदान केंद्रावर मतदारांची अचानक गर्दी वाढल्याने चांगलाच गोंधळ उडाला. भिमनगर परिसरातील रहिवासी चंपतराव रामाजी घुमे या ११० वर्षीय वृद्ध मतदारानेदेखील जि.प.सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ६ वाजतानंतर मतदान केंद्राच्या आवारात असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यामुळे ६ वाजतानंतरही मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली.
डॉक्टरांच्या घोडेस्वारीने वेधले मतदारांचे लक्ष
वणीतील डॉ.संकेत अलोणे व डॉ.विकास हेडाऊ यांनी सोमवारी सकाळी घोडेस्वारी करत मतदान केंद्रावर जाऊन मतदारांचे लक्ष वेधले. सर्वप्रथम डॉ.हेडाऊ यांनी न.प.शाळा क्रमांक सहामध्ये मतदान केले, तर डॉ.अलोणे यांनी शाळा क्रमांक पाचमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.