Maharashtra Gram Panchayat Election Results : ७३ व्या वर्षीही निवडणूक जिंकली, यवतमाळ जिल्ह्यातील हरिद्वार खडकेंचा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 06:52 PM2021-01-18T18:52:25+5:302021-01-18T18:53:09+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results : सावरगडच्या विकासाचा गड सर करण्याच्या ध्येयाने हरिद्वार खडके यांना झपाटले होते. १९७२ पासूनच त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयाची मोहाेर लावली.
यवतमाळ : लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना लोकांच्या कमाविलेल्या विश्वासाच्या बळावर वयाच्या ७३ व्या वर्षीही निवडणूक जिंकण्याचा बहुमान यवतमाळ तालुक्यातील सावरगडच्या हरिद्वार खडके यांनी मिळविला आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता, न थकता काम केल्याची पावती त्यांना दहाव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याच्या माध्यमातून मिळाली आहे. अपराजित उपाधी त्यांना यारूपाने मिळाली आहे.
सावरगडच्या विकासाचा गड सर करण्याच्या ध्येयाने हरिद्वार खडके यांना झपाटले होते. १९७२ पासूनच त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयाची मोहाेर लावली. प्रत्येक निवडणुकीत विजयी होत सरपंच, उपसरपंच ही पदे त्यांना आलटून-पालटून मिळाली. १९७२ ते २०२० या कालावधीत त्यांनी तब्बल २० वर्षे सरपंच म्हणून काम केले. १५ वर्षे उपसरपंच आणि दोन वेळा सदस्य अशी ४५ वर्षांची त्यांची कारकीर्द उल्लेखनीयच नव्हे, तर गाजत राहिली. विरोधकांवर लिलया मात करत विजयाचा गड त्यांनी सर केला.
लोकांची गावातीलच नव्हे, तर जिल्हा प्रशासनाशी संबंधित कामासाठी खडके हे एनी टाईम उपलब्ध राहतात. अडल्या नडल्यांच्या मदतीला धावून जातात. यामुळेच ते याहीवेळी विजयाचे मानकरी ठरले आहे.
दहाव्या पंचवार्षिकमध्ये माझा झालेला विजय हा काँग्रेस आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचे श्रेय आहे. केवळ रस्ते, नाल्यांमध्ये गुंतून न राहता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, गोरगरिबांना अर्ध्यारात्रीही मदतीला धावण्यासाठी आपण सतत प्रयत्नरत असतो.
- हरिद्वार खडके, सावरगड, ता.यवतमाळ