राजपथावरील चित्ररथाची यंदाही यवतमाळात निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:21 PM2022-01-25T12:21:24+5:302022-01-25T12:35:33+5:30
विदर्भातील यवतमाळ येथे साकारण्यात येणारी ही कलाकृती ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यामध्ये आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती व प्रजातींच्या शिल्पाचा यामध्ये समावेश आहे.
यवतमाळ : प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथाची निर्मिती करण्याचा मान सलग दुसऱ्या वर्षीही यवतमाळला मिळाला आहे. या रथासाठीची विविध शिल्पं यवतमाळ येथील ३५ कलावंतांनी साकारली असून, कलावंत भूषण मानेकर यांच्या कलादालनामध्ये त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्ररथात जैवविविधता मानके दर्शविण्यात आली आहेत. आदिवासीबहुल जिल्हा यवतमाळ येथील कलावंतांना हा चित्ररथ साकारण्याचा मान मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
विदर्भातील यवतमाळ येथे साकारण्यात येणारी ही कलाकृती ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यामध्ये आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती व प्रजातींच्या शिल्पाचा यामध्ये समावेश आहे. दर्शनी बाजूस ‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच, दीड फूट राज्यफूल दर्शविणारे ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोटी फुलपाखरे यांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी आणि युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे.
...या कलावंतांचे योगदान
ही सर्व शिल्प भूषण मानेकर, भूषण हजारे, रोशन बांगडकर, नीलेश नानवटकर, उमेश बडेरे, शुभम ताजनेकर, तेजस काळे, राहुल मानेकर, रितिक हेमणे, यश सरगर, वेदांत बकाले, मयूर गवळी, दिनेश चांदोरे, योगश हेमणे, अभय धारे, संतोष प्रजापती आणि सनी गंगासागर या कलावंतांनी साकारली आहेत.
चित्ररथाला नागपुरी 'टच'
हा चित्ररथ साकारण्याचा मान भूषणसह त्याच्या सहकाऱ्यांना मिळाला. विशेष म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील शुभ ॲडस्चे संचालक तुषार प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हा चित्ररथ तयार करण्यात येत असून यामधील शिल्प भूषणच्या कलादालनात तयार केली आहेत.
सर्व कलावंत दिल्लीत
दोन दिवसआधी दिल्ली येथे संपूर्ण संच पोहचला असून त्या ठिकाणी या सर्व भागांना एकत्रित (असेम्बलिंग) करण्यात आले. विशेष म्हणजे मागील वर्षीही यवतमाळ येथील प्रवीण पिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांनी ‘महाराष्ट्रातील संतांचा गौरवशाली इतिहास’ या चित्ररथाची निर्मिती केली होती.