ग्राहकांना वितरणचा महा‘शॉक’
By Admin | Published: January 13, 2015 11:05 PM2015-01-13T23:05:42+5:302015-01-13T23:05:42+5:30
डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून सर्व सामान्य ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. नियमित बिलापेक्षा अधिक बिल आल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला.
वाढीव दराने बिल : सबसिडी नाकारल्याने ग्राहकांवर थेट ओझे
यवतमाळ : डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून सर्व सामान्य ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. नियमित बिलापेक्षा अधिक बिल आल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला. नवीन सरकारने विजेसंदर्भातील सबसिडी नाकारल्याने वाढीव दराचे ओझे थेट ग्राहकांवर पडले असून त्यातून वीज बिलात २० टक्क्याने वाढ झाली आहे. वितरण कंपनीने ग्राहकांना जणू महा‘शॉक’ दिला आहे.
दर महिन्याला होणारा रिडींगचा घोळ आणि बिलातील अनंत चुकांमुळे आधीच वीज ग्राहक त्रस्त आहे. त्यातच डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून अनेक जण चक्रावून गेले आहे. नियमित येणाऱ्या वीज बिलापेक्षा अधिक बिल पाहून अनेकांनी आपल्या घरच्या मीटरची पाहणी केली. रिडींग तर बरोबर आहे. मग बिल का जास्त आले याची चौकशी करू लागले. परंतु कुठेच थांगपत्ता लागत नाही. परिणामी अनेकांनी अधिक बिल आले म्हणून कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयाकडे धाव घेतली आहे.
वीज वितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव २०१२ मध्ये सूचविला होता. त्यावेळी या वाढीव दराला मंजुरी मिळाली होती. मात्र तत्कालीन राज्य शासनाने ग्राहकांवर भार येऊ नये म्हणून सबसिडीच्या रुपात वीज दरवाढीचा भार उचलला होता. नोव्हेंबर २०१४ पर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नवीन सरकार सत्तारुढ होताच नवीन सरकारने ही सबसिडी नाकारली. परिणामी वीज बिलात सरासरी २० टक्क्याने वाढ झाल्याचे दिसत आहे. सबसिडी काढल्याने वाढीव दराने बिल आले आहे. आधीच विविध भारांसह वीज बिल येत आहे. त्यात आता सबसिडी विरहित बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. (शहर वार्ताहर)