"मै मेरी झांशी नही दुंगी..." महायुतीच्या मेळाव्यात गवळींनी आपल्याच मंत्र्यांना ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 02:18 PM2024-01-15T14:18:51+5:302024-01-15T14:30:36+5:30
भावना गवळी या विद्यमान खासदार असून यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी थेट महायुतीच्या मेळाव्यातून जाहीरपणे सांगितले
मुंबई/यवतमाळ - आगामी लोकसभा निवडणुकांच्या घोषणांसाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनही कामाला लागले असून राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये तिसरी बार मोदी सरकार म्हणत भाजपाने रणशिंग फुंकले आहे. तर, महाराष्ट्रातही शिवसेना-राष्ट्रवादी व भाजपाच्या महायुतीने ४५ जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी, महायुतीच्या संकल्प मेळाव्याचे आयोजन जिल्हास्तरावर होत आहे. त्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकांत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं.
भावना गवळी या विद्यमान खासदार असून यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी थेट महायुतीच्या मेळाव्यातून जाहीरपणे सांगितले. तसेच, महायुतीने दुसरा उमेदवार दिल्यास त्याला विरोध करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. या मतदारसंघातून महायुती भावना गवळी यांच्याऐवजी पालममंत्री संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे. त्यावर भाष्य करताना भावना गवळी यांनी, मै मेरी झांशी नही दुंगी... असे म्हणत लढाईची तलवार उंचावल्याचं पाहायला मिळालं.
मेरी झांशी नहीं दुंगी' असा नारा देत खासदार भावना गवळी यांनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर दावा केला. महायुतीच्या समन्वय मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. त्यावेळी महायुतीतील प्रतिस्पर्ध्यांना देखील साद घातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बहीण म्हणून आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आमदार मदन येरावार देखील मला साथ देतील. तर, पालकमंत्री संजय राठोडांना लोकसभा लढवायची असेल तर लहान बहीण म्हणून मला त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी द्यावी अशीही मागणी गवळी यांनी केली. पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यात एक लोकसभा मतदारसंघ बंजारा समाजासाठी सोडावा, असे म्हणत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा ठोकला. त्यामुळे, महायुतीच्या मेळाव्यात यवतमाळ वाशीम जागेवरून दावे प्रतिदावे पाहायला मिळाले.
दरम्यान, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशी आहे. पण, यावेळी शिवसेनामध्ये फूट पडल्याने परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे. तर गवळी यांना शिवसेनेतूनही आव्हान असल्याची चर्चा आहे.