भाजपा सदस्यांना सांभाळा
By admin | Published: March 19, 2017 01:23 AM2017-03-19T01:23:26+5:302017-03-19T01:23:26+5:30
प्रमुख चारही पक्षातील गुंतागुंत पाहता जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या लढाईत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
जिल्हा परिषद : नेत्यांना आदेश, सर्वच पक्षांना फुटीची भीती
यवतमाळ : प्रमुख चारही पक्षातील गुंतागुंत पाहता जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या लढाईत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सर्वच पक्ष एकमेकांच्या सदस्यांवर नजर ठेऊन आहेत. त्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
२१ मार्चला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. परंपरागत भाजपा-शिवसेना युती झाल्यास सहज सत्ता स्थापन होऊ शकते. परंतु हे दोनही पक्ष एकमेकाला पाण्यात पाहत आहेत. दोघांनीही एकमेकाला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. वर्चस्वाच्या या लढाईत यातील एका पक्षाने तर चक्क विरोधी बाकावरील काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत बसली तरी हरकत नाही, अशी मानसिकता बनविल्याचे बोलले जाते.
जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण नेमके कसे बसणार याची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे. भाजपा-सेना युती होणार, शिवसेना-राष्ट्रवादी सोबत बसणार की या दोनही पक्षांना भाजपा बाहेरुन पाठिंबा देणार असे वेगवेगळे पर्याय पुढे येत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे समीकरण पुसदमधून जुळण्यासाठी पोषक वातावरण असले तरी यवतमाळातील नेत्याकडून त्याला विरोध होतो आहे. विशेष असे राष्ट्रवादीच्या तमाम सदस्यांची सूत्रे गटनेत्याच्या हातात असून हा पदाधिकारी यवतमाळातील पक्षाच्या नेत्याच्या शब्दाच्या बाहेर नाही. आधी यवतमाळचा शब्द नंतर पुसदचा अशी या गटनेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे पुसदमधून काहीही गणित जुळले तरी सभागृहात गटनेता काय भूमिका घेतो यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. यवतमाळातून सेनेच्या समीकरणाला होणाऱ्या विरोधामागे येथील नेत्याची भाजपाशी असलेली जवळीक आणि विधान परिषदेतील अर्थकारणावरून सेनेला असलेला विरोध हे कारण चर्चिले जात आहे.
अखेरच्या दिवसापर्यंत भाजपा-सेनेतील छत्तीसचा आकडा कायम राहिल्यास या संधीचा लाभ उठविण्याची तयारी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही चालविली आहे. हे दोनही पक्ष एकत्र येऊन आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वच पक्षांना आपले उमेदवार फुटण्याची भीती आहे. दरम्यान भाजपाला आपल्या पक्षातील जिल्हा परिषद सदस्य सांभाळून ठेवा, अशा सूचना श्रेष्ठींकडून स्थानिक नेत्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपा आमदारांचा आपल्या मतदारसंघातील पक्षाच्या सदस्यांवर वॉच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेसाठी सात ते आठ सदस्यांची गरज असल्याने त्यांनीही भाजपा, सेनेच्या सदस्यांवर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)